भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांचा मिटकरींवर हल्लाबोल
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरील टिकेचा घेतला समाचार
फुलचंद भगत
वाशिम : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चड्डी व टोपीवरून केलेल्या टिकेला भाजपाने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. दादा जेव्हा जनसेवेत रूजू झाले तेव्हा आपल्याला चड्डी घालण्या इतपत भान आले होते का? असा सवाल करीत मिटकरी, राजकारणात गर्व व अहंकाराचे घर नेहमी खाली असते. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत कुटासकरांनी तुमचे गर्वहरन करून ही बाब अधोरेखित करून दिली आहे. त्यामुळे हुजरेगिरी बंद करा आणि मोठ्यांचा सन्मान करायला शिका अशा शाब्दिक हल्लाबोल भाजपाचे वाशिम जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांनी आ. मिटकरींवर केला आहे.
गत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राजकारणात आले तेव्हा तुम्ही चड्डी व टोपीत होते असे मिटकरी बोलले होते. मिटकरी यांच्या या बेताल वक्तव्याचा भाजपाने खरपूस समाचार घेतला. भाजपाचे वाशिम जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांनी मिटकरी यांच्या टिकेला प्रतिउत्तर देतांना त्यांच्यावर शाब्दिक आसूड ओढले. आमदार मिटकरी चंद्रकांतदादांवर टिका करण्यापूर्वी तुमचे राजकारण व समाजकारणातले योगदान काय?ते तपासा. पवार व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदून दादांनी विधानपरिषदेचा गड सर केला. आपल्या सारखी हुजरेगिरीकरून त्यांनी आमदारकी मिळविली नाही हे विसरू नका. विद्यार्थीदशेपासून दादांनी जनसेवेचा वसा घेतला तेव्हा तुम्हाला चड्डी घालण्याचे तरी भान आले होते का? केवळ पवार कुटुंबाला खूश करण्यासाठी तुम्ही जो खटाटोप करीत आहात, त्याला विराम द्या असा सल्ला नागेश घोपे यांनी मिटकरी यांना दिला आहे. राजकारणात गर्व व अहंकार असू नये, परंतु तुम्हाला हे कुणी सांगावे? जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत कुटासा सर्कलमधील मतदारांनी तुमचे चांगलेच गर्वहरण केले. त्यातूनही तुम्ही धडा घेतला नाही यावरूनच तुमची राजकीय प्रगल्भता दिसून येते. केवळ प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी कुणावरही टिका करायची, ‘धर जीभ लावं टाळू’ला ही वृत्ती थांबवा असा टोमणाही घोपे यांनी लगावला आहे.
*टोपीसाठी डोकं लागते अन बुद्धीही*
आ. मिटकरी टोपी घालण्यासाठी डोकं लागतं आणि डोक्यावर नेमकी कोणती टोपी घालावी हे ठरविण्यासाठी त्या डोक्यात सद्बुद्धी लागते. तुम्ही ज्या टोपीकडे अंगुलीनिर्देश केला ती टोपी डोक्यावर घालण्यात जो आनंद आहे हे तुमच्या सारख्याला कळायचे नाही. तुम्ही फक्त पवार कुटुंबाची हुजरेगिरी करून तुमची आमदारकी व पक्षातील जागा कशी शाबुत राहील याचा विचार करा असा घणाघात भाजपाचे वाशिम जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांनी केला आहे.