पुणे / लोहगाव, ता. २६ : आळंदी रस्त्यावर विश्रांतवाडीत क्रेनच्या आधारे चारचाकी गाडी उचलून या गाडीसह भर रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरेल अशा ठिकाणी उभी केलेल्या या ‘क्रेन’चे छायाचित्रे काढली म्हणून, या क्रेनवर कार्यरत असलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळ प्रतिनिधीचा भलताच संताप आला. या महिला वाहतूक पोलीस क्रेनमधून चारचाकी मालकाशी तडजोड करत होत्या, त्यांच्या साथीला क्रेनवर कार्यरत खाजगी ठेकेदाराचे कर्मचारीही गाडीमालकाला अरेरावीची भाषा वापरत होते.
ज्योती पवार असे या विश्रांतवाडी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्या पोलीस नाईक पदावर आहेत. विश्रांतवाडी वाहतूक शाखेजवळ त्यांनी एक पदपथावर उभी केलेली चारचाकी क्रेनच्या साह्याने उचलून आणली. या चारचाकीसह ही क्रेन ‘मेंटल कॉर्नल’ला उभी करून त्या चारचाकी मालकाशी क्रेनमध्ये पुढे बसून चर्चा करत होत्या. याठिकाणी जेल रस्त्यावरून क्रेनच्या पाठीमागून अनेक गाड्या भरधाव वेगात आळंदी रस्त्यावर येत होत्या. या वाहनांना ही चारचाकी गाडीसह उभी असलेली क्रेन अडथळा ठरत होती. त्यामुळे सकाळ प्रतिनिधीने ही छायाचित्रे घेण्याच्या प्रयत्न करत असताना क्रेनमध्ये पुढे बसलेल्या पवार व क्रेनच्या मागील बाजूस पाय लटकावत बसलेले लाल गणवेशातील खाजगी कर्मचारीही पटकन खाली उतरले. त्यांनतर पवार यांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीकडे ओळखपत्राची मागणी करत स्वतःच्या मोबाईलवर सकाळ प्रतिनिधीचे शूटिंग सुरू केले. तर क्रेनवरील खाजगी कर्मचाऱ्यांनी सकाळ प्रतिनिधी व त्यांचौ दुचाकीचे छायाचित्र घेतले. एवढ्यावरच न थांबता शासकीय कामात अडथळा निर्माण केला, म्हणून कारवाई करण्याची धमकीही पवार यांनी दिली. अरेरावीची भाषा वापरून सकाळ प्रतिनिधीला विश्रांतवाडी वाहतूक शाखेत बसवून पवार निघून गेल्या. त्यानंतर पवार यांच्या वरिष्ठांनी खात्री करून सकाळ प्रतिनिधीला जाण्यास सांगितले. याबाबत चौकशी केली असता, पवार या अशाचप्रकारे नागरिकांशी आतेताईपणाने वागत असल्याची माहिती मिळाली. नागरिकांनी त्यांच्याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.