घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
भगवंताच्या प्राप्तीसाठी नरदेहाची उत्पत्ती झाली असून मानवाने जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळविण्यासाठी भगवंताचे सतत आठवणीत नामस्मरण करावे , असे प्रतिपादन हभप रामेश्वर महाराज गुंड शिरपूरकर यांनी केले.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहील्या दिवशी किर्तन मालेचे पुष्प गुंफताना येथे केले.महाराज पुढे म्हणाले की,संतांची महती कळण्यासाठी उंची,खोली जाणून घेवून संत व्हावे लागते.महाराजांनी संतांची व्याख्या स्पष्ट केली.परमात्म्याशी जो ओतप्रोत आहे,तो संत.ज्याला माणसातला देव कळतो त्याला दगडातला देव कळतो .कर्माचे भोग हे ज्याचे त्याला भोगावेच लागतात.ब्रह्मनिष्ठा म्हणजे सर्व ठिकाणी भगवत् भाव ! ज्याने षढविकार धुतले तो साधू,प्रपंचात संत असतात परंतु गुंतून राहत नाहीत, तुम्ही आम्ही मात्र आंब्याच्या कोयी प्रमाणे गुंतलेलो आहोत.पुढे महाराज म्हणाले की,संत हे अधमाअधम नसतात.जसे अन्न तसे मन हा मुद्दा स्पष्ट करताना महाराजांनी सांगितले की,सज्जनांची भाजी भाकरी खा परंतु दुर्जनांचे मिष्टान्न सेवन करू नये.उपस्थित श्रोत्यांना उपदेश करताना महाराजांनी सांगितले की,आयुष्याचा एक क्षण आणि अन्नाचा एक कण वाया घालवू नका.माणसाच्या अंगी कायम नम्रता असली पाहिजे.