Home मराठवाडा नैवेद्य नव्हे तर ईश्वराला भोग लावला पाहिजे- हभप त्र्यंबक महाराज दस्तापूरकर

नैवेद्य नव्हे तर ईश्वराला भोग लावला पाहिजे- हभप त्र्यंबक महाराज दस्तापूरकर

187

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

परमार्थात प्रगती साधायची असेल तर अंतःकरण शुद्ध,साफ असले पाहिजे.अन्न दोषी असतं आणि पवित्रही असतं.जसे अन्न तसे मन म्हणून आपल्याकडे भगवंताला नैवेद्य दाखवला जातो.परंतू उत्तर प्रदेशात नैवेद्य नव्हे तर ईश्वराला भोग लावण्याची प्रथा आहे, असे प्रतिपादन हभप त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांनी येथे काल्याच्या किर्तनात स्पष्टीकरण दिले.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची आज शनिवारी,ता.१३ रोजी दस्तापूरकर महाराज यांच्या किर्तनाने सांगता झाली.महाराज पुढे म्हणाले, गेल्या दहा-वीस वर्षात गाथा,ज्ञानेश्वरी, भागवत ग्रंथातील गवळणी कमी झाल्या.गाथ्यातील गवळणी कमी झाल्या आणि ‘माथ्यातील’ गवळणींनी देवाचे चारित्र्य खाली आणलं.माठाला गेला तडा… ऐवजी माथ्याला गेला तडा म्हटले पाहिजे. सुख पाहिजे असेल तर कर्म चांगले असले पाहिजे.त्यात कर्म लोभी असू असू नये.क्षेत्र कोणतेही असो कर्म चांगले असेल तर परमार्थ करायला कोठे जाण्याची गरज नाही.आपण सर्व ईश्वराची लेकरं आहोत.आपलं लेकरू गरीब असावं असं आपल्या बापाला वाटत नाही.परंतु आपणच दारिद्रय ओढवून घेतले आहे.त्यास ईश्वर जबाबदार नाही.परमार्थात सुख हवे असेल तर अंतःकरण शुद्ध,साफ ठेवा.जीथे विषय तीथे ईश्वर नाही.सुख शब्द ऐकायला बरा वाटतो पण सुख मिळत नाही.सर्व सुख फक्त परमार्थात मिळते प्रत्येकाचे अंतःकरण मंदिर आहे,त्यात ईश्वरिय वास्तव्य आहे.देह देवाचे घर…तीथे आत्मा परमेश्वर आहे.परंतु तीथे आपण देवाची सत्ता, अधिकार काढून घेतला आहे. आपण अंतःकरणात
विषयाचा अंगीकार केला म्हणून अपवित्र,अस्वच्छ झाले आहे,असे हभप त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांनी स्पष्ट केले.परभणीचे खासदार संजय जाधव जिल्हा परिषद सदस्य अंगद अंबुरे, जालना जिल्हा परिषद सदस्य अंशिराम कंटुले , मंगलनाथ मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कानडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी किर्तन श्रवणासह महाप्रसादाचा लाभ घेतला.हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने संयोजकांचे आभार मानण्यात आले.यशस्वीतेसाठी तरूण मित्रमंडळाने परिश्रम घेतले.