मनिष गुडधे
अमरावती, दि.२० :- कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे .लसीकरण मोहिमेंतर्गत आता लसीकरण वाहन थेट नागरिकांच्या दारी जात असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे .
या उपक्रमाला नागरिकांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशान्वये तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा आरोग्य कार्यालयातून वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरण वाहन मिळाले. जिल्हा परिषद अध्यक्ष गजानन राठोड यांच्या हस्ते या लसीकरण वाहनाचे काल (दिनांक १९ नोव्हेंबर )उद्घाटन करण्यात आले .लसीकरण वाहनाच्या सहाय्याने वलगाव येथील वसुपुरा , निर्मळ हॉस्पिटल लढ्ढा गल्ली तसेच सौदागरपुरा येथील ५५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे .लसीकरण चमूमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पाटील, समुदाय अधिकारी डॉ. प्रिती चव्हाण, आरोग्य सेविका राधिका पखाले, आरोग्य सहायक श्री. नवाथे उपस्थित होते. आजही या भागामध्ये लसीकरण वाहनाद्वारे लसीकरणाचे कार्य सुरू आहे.लसीकरण वाहनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होत आहे .थेट आपल्या दारी लसीकरण वाहन आल्यामुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण वाहनामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये जाऊन लसीकरण करणे सहज शक्य होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .दिलीप रणमले यांनी दिली आहे.कोरोना लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहू नये यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे . कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी दुर्लक्ष करून चालणार नाही .तरी ज्या नागरिकांचा पहिला व दुसरा डोस अदयाप प्रलंबित आहे त्यांनी नजिकच्या लसीकरण केंद्रावर जावून तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.