Home विदर्भ अमरावती दंगलीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर

अमरावती दंगलीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर

221

मनिष गुडधे – अमरावती 

अमरावती इथलं वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रीया अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ॲड यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सूज्ञ आहे, ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास ॲड यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. अमरावती इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला या प्रसंगी शांतता हवीय हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवीय. आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत, मात्र त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचं वातावरण बिघडवायचं आहे असं दिसतंय. अमरावतीत १२ आणि १३ तारखेला घडलेल्या दोन्ही घटना तितक्याच दुर्दैवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामिल असलेल्यांवर कारवाई सुरू आहे, इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा ही विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे. असं ॲड यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तिथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचं स्वागत केले आहे, पण अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचं आवाहन केलं असतं तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी या घटनेचं राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे हे मान्य केलंय.  मात्र याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफी ही त्यांनी मागीतली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी केलीय. 

१२ तारीख आणि १३ तारखेच्या दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेलीय. कोणालाच सोडणार नाही ही सरकारची भूमिका आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत आहेत अशी टीका ही त्यांनी केली आहे. रझा अकादमीचे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत गृहविभाग कारवाई करत आहे, त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसंच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात ही चर्चा केली जाईल अशी माहिती ही ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.