सतीश डोंगर
मायणी दि. २३ (प्रतिनिधी) : “१ जानेवारी, २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करत असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाही मजबूत करण्यात सहभाग दिला पाहिजे. सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक हे समाजकारण व राजकारणात यायला हवेत, तरच देशाची लोकशाही भक्कम होईल,” असे प्रतिपादन खटावचे नायब तहसीलदार व निवडणूक अधिकारी सीताकांत शिर्के यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना व भारतमाता ज्युनियर कॉलेज, मायणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मतदार नाव नोंदणी अभियानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी हे होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. उत्तम टेंबरे यांनी केले. यावेळी भारतमाता ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार पिसाळ, मंडल अधिकारी महेश चक्के, तलाठी गौरव खटावकर, प्रा. डी. आर. महामुनी, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा. अमर लोखंडे, प्रा. निर्मला निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
मताधिकाराचे महत्त्व विशद करताना नायब तहसीलदार सीताकांत शिर्के पुढे म्हणाले, “प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करून लोकशाही, निवडणुका व संविधान याबाबत जनजागृती करण्याचे धोरण निवडणूक आयोगाने राबविले आहे. आपला देश जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. या देशाची प्रगती जागरूक व जबाबदार नागरिकांमुळेच होत आहे. शेजारील राष्ट्रांमध्ये अराजक असून तेथील नागरिक देश सोडून पळून चालले आहेत. हे दृष्य पाहिल्यानंतर भारतीय संविधानाचे, लोकशाहीचे व एकात्मतेचे महत्त्व आपल्या लक्षात येते. निवडणूक आयोगाने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ अखेर मतदार नोंदणी अभियान सुरू केले आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी करून घ्यावा.”
आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विलास बोदगिरे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. यावेळी प्रा. शिवशंकर माळी, प्रा. विकास कांबळे, प्रा. श्रीकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.