Home मराठवाडा त्या शाळा व तुकड्यांना अनुदान मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – शिक्षक आमदार...

त्या शाळा व तुकड्यांना अनुदान मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – शिक्षक आमदार विक्रम काळे

292

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – घोषित व अघोषित शाळा व तुकड्यांना अनुदान मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असा निर्धार शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जालना येथे आयोजित शिक्षक दरबारात व्यक्त केला.

जालना जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचार्‍यांच्या अडी-अडचणी सोडविण्या संदर्भात जिल्हा परिषद जालना येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने आयोजित शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे बोलत होते.

या शिक्षक दरबारात व्यासपीठावर प्रा.डॉ.सुखदेव मांटे,शिक्षणाधिकारी नागेश मापारी,उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात,वेतन अधीक्षक शेवलीकर,बाबसिंग बायस,रफिक शेख,के.पी.पाटील हे उपस्थित होते.उर्दू माध्यमिक विद्यालयातील कला शिक्षक रफिक शेख यांच्या सेवापुर्ती निमित्त राष्ट्रवादी शिक्षक संघ जालनाच्या वतीने आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सपत्नीक साडीचोळी देऊन सेवा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की,आपण सर्व अघोषित शाळा व तुकड्यांना अनुदानासाठी घोषित करणे व वेतन अनुदान देणे,त्रुटी पूर्तता शाळांची यादी घोषित करणे व त्यांना अनुदान घोषित करणे.याबरोबरच या सर्व शाळांना यापुढे प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळावे.यासाठी माझी आग्रही भूमिका आहे व ती पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

तसेच दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन लागू करावी.यासाठी आमचा प्रयत्न सुरूच आहे.तोही निर्णय शिक्षक,कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे.त्यासाठीही आम्ही आग्रही आहोत.कोविडमुळे विद्यार्थी संख्येची अडचण होती.परंतु त्यातही राज्य शासनाच्या वतीने मार्ग काढून शाळांना सोयीच्या होतील.अशा सन २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षाच्या संच मान्यता आता जिल्हा स्तरावर आल्या आहेत.त्यांचेही वितरण तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांनी करावे.अशाही सूचना यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिल्या.

याप्रसंगी उपस्थित असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे जिल्हा पातळीवरील प्रश्न ऐकून घेऊन ते निकाली काढण्याबाबत संबंधित शिक्षण अधिकारी व वेतन अधीक्षक यांना योग्य त्या सूचना आमदार काळे यांनी दिल्या.आमदार काळे यांच्या जालना जिल्हा दौऱ्यामध्ये सकाळच्या सत्रात शहरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास वायाळ,विभागीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर टेकाळे,चंद्रकांत झाल्टे,पंडितराव इंगळे, विजय उबरहंडे,संतोष झोरे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य उद्धव मस्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकाश बांगडे यांनी मानले.राष्ट्रवादी शिक्षक संघाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.