घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोसंबी फळपिक विमा वितरणासाठी एचडीएफसी एर्गो कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणे सुरू झाले आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांसह शेतकर्या कडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात मोसंबी फळपिकाचा ११ हजार आठशे १३ शेतकऱ्यांचा ३८ कोटी २१ लाख ८६ हजार रुपये मंजूर झाला आहे.मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला नव्हता त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही.तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही,अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात तीन दिवस मुक्काम ठोकला होता.आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे यांच्या हस्ते लेखी पत्रानंतर मुक्काम ठोको आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
◆ एकूण मंजूर विमा रकमेच्या ८५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित १५ टक्के रक्कम शासन अनुदानाची रक्कम विमा कंपनीला मिळाल्यानंतर खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे विमा कंपनी प्रतिनिधीनी सांगितले आहे.