संकलन – सुनिल गवळी
धुळे चाळिसगाव ही शटल रेल्वेसेवा कोरोनामुळे दोन वर्षे बंद होती . या पॅसेंजर शटल सेवेऐवजी आता सोमवार पासून दिवसातून दोन वेळा मेमु सेवा सुर करण्यात आली आहे . काही का असेना दोन फेर्या का असेना, पण सेवा एकदाची सुरु झाली म्हणून प्रवाशांनी आनंद व्यक्त केला . रेल्वे राज्यमंत्री ना . रावसाहेब दानवे व माजी केंद्रीय मंत्री खा . सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमही पार पडला . सकाळी एक वेळा व सायंकाळी एक वेळा अशी दिवसातून दोनवेळा ही गाडी चाळीसगावहून धुळ्यास येईल व लागलीच धुळ्याहून चाळिसगाव कडे रवाना होईल . चाळिसगाव हे मुंबई दिल्ली दरम्यान मध्य रेल्वेचे एक जंक्शन आहे . या मेमु मुळे धुळ्यास चाळिसगाव जंक्शनशी कनेक्टीव्हिटी मिळणार आहे . मात्र असे असले तरी चाळिसगाव जंक्शनवर बऱ्याचशा प्रमुख मेल एक्सप्रेस प्रवासी गाड्या थांबत नाहित . त्यामुळे मेमुच्या निमिताने धुळ्यास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाशी कनेक्टीव्हिटी मिळाली असली तरी ती अर्धवट आहे . या ऐवजी ही मेमु गाडी आताच धुळे – नाशिक किंवा तांत्रिक अडचण असेल तर धुळे – मनमाड अशी सुरु करावयास हवी होती . नाशिक व मनमाडला मुख्य लाईन वरील बहुतेक गाड्यांना थांबे आहेत . शिवाय मनमाडहून औरंगाबाद पूणे व मुंबई दोन्ही कडे स्थानिक एक्सप्रेस गाड्यात धुळे कोटा ठेवता येवू शकतो . धुळ्याहून सुटणाऱ्या दोन्ही मेमु गाड्यात जवळपास ११ ते १२ तासांचे अंतर आहे . मधला एवढा मोठा अवधी हा गाडी मनमाड – नाशिक पर्यंत जाऊन परत यायला पुरेसा आहे . यापूर्वी धुळे – चाळिसगाव शटलला पूणे व मुंबई अशा स्वतंत्र दोन – दोन बोग्या लावल्या जात असत . आता या बोग्यांबाबत रेल्वेने काहीच खुलासा केलेला नाही . मुंबई बोगीत तर पेशंट , वृद्ध व्यक्ती , महिलांची चांगली सोय होत असे . आता ती अडचण कायम आहे . मेमुच्या या उद्घाटन प्रसंगी खा. डॉ. सुभाष भामरे यांनी सध्या तोट्यात सुरु असलेली मनमाड – दादर ही पॅसेंजर धुळ्यापर्यंत वाढवावी , अशी मागणी केली आहेच .
ती रास्तच आहे . रेल्वे राज्यमंत्री ना . दानवे त्यावेळी उपस्थित होते . ना दानवेंनी धुळेकरांकडे मनपा निवडणुकित पन्नास नगरसेवक मागितले . ते धुळेकरांनी त्यांना दिले . मग आता रिटर्न गिफ्ट द्यायची त्यांची ‘ बारी ‘ आहे . त्यांनी खा . डॉ . सुभाष भामरेंच्या सूचनेप्रमाणे मनमाड – दादर गाडी धुळ्यापर्यंत वाढविण्यास रेल्वे अधिकाऱ्यांना भाग पाडावे .अशी धुळे कराची मागणी आहे. धुळेकरांच्या ऋणातून काहीसे मुक्त होण्याची त्यांना ही संधी चालून आली आहे . धुळेकरांची धुळे – मुंबई , धुळे – पुणे , औरंगाबाद जालना धुळे – नागपूर अशा स्वतंत्र प्रवासी गाड्या सुरु करण्याबाबत फार पूर्वीपासून मागणी आहे . मध्यंतरी पंचवटी एक्सप्रेस ही मनमाड ऐवजी धुळ्याहून सोडण्याची मागणी होतीच .
धुळे रेल्वेच्या मुख्य मार्गावर यावे यासाठी मनमाड – धुळे – इंदोर या स्वतंत्र रेल्वेमार्गाचे भुमिपुजन खद्द पंतप्रधान ना . नरेंद्र मोदींनी केले आहे . त्याचा प्रथम टप्पा तातडीने धुळे – नरडाणा होणार होता . पाच पुलांची निविदाही निघाली होती . पण कोरोनाच्या महामारीने घात केला . आता बर्यापैकी कोरोना ढिला पडला आहे . सर्व व्यवहार सुरू होत आहेत . त्यामुळे या कामांनाही चालना कशी मिळेल हे बघितले गेले पाहिजे . खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते भुमिपुजन झालेले हे काम आता अधिक रेंगाळणे योग्य ठरणार नाही . धुळ्याहून नाशिक मुंबई , पुणे, औरंगाबाद जालना नागपूर विविध ठिकाणी गाड्या सोडावयाच्या असतील तर धुळे स्टेशनला टर्मिनस चा दर्जा देवून येथे पाणी , स्वच्छता , देखभाल दुरुस्तीचे युनिट आधी सुरु करणे गरजेचे आहे . त्या दिशेनेही खा . डॉ. सुभाष भामरे व रेल्वे राज्यमंत्री ना . रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे . यामुळे खान्देश चे नागरिक पंतप्रधान मोदींना धन्यवाद देतीलच..!