मुंबई / डहाणू. (प्रतिनिधी) – दि. 15/12/2021 रोजीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तिन्ही कृषी विधेयके 2021 मागे घेण्याचा निर्णय झाला हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू (अ. ज) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी म्हंटले आहे.
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर एक वर्षांपेक्षा अधिक काळ शेतकरी आंदोलन करत होते. त्यात लखीमपूर खिरी हत्याकांडासहित जवळजवळ 715 शेतकरी शहीद झाले आहेत. दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनामध्ये दि. 14 डिसेंबर 2020 रोजी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि. 10 मार्च 2021 रोजी निदर्शने माझ्यासहित काही सदस्यांनी केली होती. ही कृषी विधेयके आणण्यापूर्वी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख नेत्यांना भेटून केंद्र सरकारच्या धर्तीवरील अशी कृषी विधेयके आणू नयेत असे निवेदन देखील आमच्या नेत्यांच्या वतीने देण्यात आले होते. आमचे नेते अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे हे संयुक्त किसान मोर्चामध्ये एक प्रमुख नेत्याची भूमिका निभावत आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील हजारों शेतकऱ्यांनी दिल्लीकडे रवाना होऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला होता. गेल्या महिन्यातच 28 नोव्हेंबरला मुंबईत आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत प्रचंड संयुक्त शेतकरी कामगार महापंचायत यशस्वी झाली. वर्षभर चाललेल्या शेतकऱ्यांच्या लढ्यामुळे भारताच्या पंतप्रधानांना जनतेसमोर दूरदृश्य प्रणालीद्वारे येऊन तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा करावी लागली होती आणि संसदेने ते कृषी कायदे प्रत्यक्षात रद्दही केले. आज दि. 15 डिसेंबर 2021 रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीने राज्यातील तिन्ही कृषी विधेयके 2021 मागे घेण्याचा निर्णय घेतला हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विजय आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू (अ. ज) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी म्हटले आहे.
Post Views: 449