मनिष गुडधे
अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरची निवड प्रक्रिया आज गुरुवारी ऐनवेळी रद्द करण्यात आली. यामुळे अमरावतीसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला. उमेदवारांची प्रचंड गर्दी, आक्रोश यामुळे जिल्हा परिषदेतील वातावरण तब्बल तीन तास तापले होते. उमेदवार व प्रशासन यांच्यात वाद सुरु होता. पोलीसांनी यात यशस्वी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला.जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे स्थलांतरीत नागरिकांची माहीती गोळा करण्यासाठी एका अॅपची निर्मिती करण्यात आली होती. हा अॅप हाताळण्यासाठी सदर विभागाद्वारे विभागाच्या संकेतस्थळावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची एक जागा रिक्त असून निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे आज बुधवारी ४ वाजता मुलाखती जाहीर करण्यात आला होत्या. मुलाखतीसाठी शेकडो उमेदवार आज बुधवारी सकाळपासून जिल्हा परिषदेत पोहोचले. परंतु दुपारी चार वाजता उमेदवारांना मुलाखती रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे उमेदवारांचा संयम सुटल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.