अमरावती – मनिष गुडधे
पोलीस खात्यातून निवृत्त झालेले सुखदेव डबरासे यांनी चक्क स्वत:च्या तेरवीचे आयोजन करून ‘माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला या!’ अशी साद घातली आहे.अमरावती : अविवाहित मुलगा मुंबईत बॉक्सिंग कोच आहे. एक मुलगी शिक्षिका, तर धाकटी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन खात्यात रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. कुठलाही ताण नाही, कर्ज नाही, आरोग्य ठणठणीत आहे. पाच वर्षांपूर्वी पोलीस खात्यातून निवृत्त झालो; पण केव्हा एक्झिट होईल, हे माहीत नाही. म्हणून पोलीस खात्यातून निवृत्त झालेले सुखदेव डबरासे यांनी चक्क स्वत:च्या तेरवीचे आयोजन करून ‘माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला या!’ अशी साद घातली आहे. त्यांनी आप्तस्वकीयांना पाठविलेली तेरवीची टिपिकल पत्रिकेची सध्या अमरावतीत जोरदार चर्चा आहे.‘एक दिन जाना है, ते कुणालाच चुकले नाही. माझे काही मित्र तर, सेवानिवृत्तीनंतर एक ते दीड वर्षातच स्वर्गवासी झाले. मृत्यूनंतर तेरवी केली जाते. अंत्यसंस्कारालाही आप्तस्वकीय जमतात. मात्र, ते पाहायला आपण नसतो. त्यामुळे जिवंतपणीच ‘गेट टू गेदर’ करायचे, आप्तांना, मित्रांना बोलवायचे, त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारायच्या. त्यातून डोक्यात एक विचार चमकून गेला अन् स्वत:ची तेरवी करण्याचा निर्णय घेतला. सेवानिवृत्त राखीव पोलीस उपनिरीक्षक सुखदेव डबरासे यांनी स्वत:च्या तेरवीमागील भूमिका ‘लोकमत’कडे मांडली. निमंत्रण, ‘मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम’ अशी सुरुवात करून त्यांनी ही पत्रिका आप्तस्वकीयांसह पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांनाही पाठविली आहे. त्यांची ही पत्रिका पाहून अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत.रहाटगाव ते राजुरा रोडवरील नवीन आयटीआय काॅलेजजवळ असलेल्या घरी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ नंतर त्यांनी भोजनदान ठेवले आहे. केव्हा मरण येईल, याची शाश्वती नसल्याने हा कार्यक्रम आपण यास्वेच्छेने करत आहोत, या कार्यक्रमाला आपली इच्छाशक्ती दर्शवावी, असे पोलीस दलातून सन २०१६ साली निवृत्त झालेले डबरासे यांनी पत्रिकेत नमूद केले आहे.