Home विदर्भ YAVATMAL रेल्वे स्थानकावर ‘शकुंतला’ बचाव सत्याग्रह – विजय विल्हेकर यांच्या उपस्थितीत...

YAVATMAL रेल्वे स्थानकावर ‘शकुंतला’ बचाव सत्याग्रह – विजय विल्हेकर यांच्या उपस्थितीत आंदोलन

680

यवतमाळ – शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या वतीने, येथील रेल्वे स्थानकावर शकुंतला बचाव सत्याग्रह करण्यात आला. यवतमाळकर नागरिक, शकुंतला रेल्वे प्रवासी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, श्रमकरी, आदिवासी बांधवांनी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहात सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी सत्याग्रहाचे समन्वयक विजय विल्हेकर यांनी केले आहे.

एकशे आठ वर्षांपूर्वी १ जानेवारी १९१३ साली पहिली मालगाडी अचलपूर-यवतमाळ या नॅरोगेज मार्गावर धावली होती. १ जानेवारी १९१४ साली पहिली पॅसेंजर रेल्वे धावली होती. त्याचे औचित्य साधून आज यवतमाळ रेल्वे स्थानकावर हे आंदोलन करण्यात आल्याचे विजय विल्हेकर यांनी सांगितले. गेल्या २ ऑक्टोबर, गांधी जयंतीपासून, मूर्तिजापूर ते अचलपूर रेल्वे मार्गावरील, सर्व स्थानकांची स्वच्छता करून, शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह करण्यात आला. या मार्गावरील अनेक नगरपालिका, ग्रामपंचायती, सामाजिक, शिक्षण संस्थांनी शकुंतला रेल्वे, आहे त्या स्थितीत युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी यासाठी ठराव घेतले आहे. ही रेल्वे सुरू व्हावी यासाठी शकुंतला रेल्वेत कार्य करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी, विनामूल्य सेवा देण्याचे मान्य करून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे बळ वाढवले, असे विल्हेकर म्हणाले. मदन इंडस्ट्रीजचे संस्थापक स्व. मदन माहुले हे मूळ यवतमाळचे आहेत. परतवाडा येथे स्थायिक होऊन त्यांनी नॅरोगेज रेल्वे निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. त्यांचे सुपूत्र रेल्वे अभियंता  ग्यानेश  माहुले यांचा शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहात सक्रिय सहभाग आहे. त्यांनी निर्मिती केलेल्या रेल्वे मलेशिया, सौदी अरेबिया आदी देशात धावत आहेत. त्यांनीही शकुंतला रेल्वे चालविण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे, असे विल्हेकर यांनी सांगितले. शकुंतला रेल्वेत किरकोळ खाद्य वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या तीन दृष्टिहीन बांधवांच्या वतीने उच्च्य न्यायालयात, याचिकासुद्धा दाखल करण्यात येणार आहे, असे विजय विल्हेकर म्हणाले. केंद्रीय रेल्वे मंत्रालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह रेल्वे प्रशासनास शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आल्याचे विल्हेकर यावेळी म्हणाले. येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळ ते अचलपूर रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर राष्ट्रध्वज फडकवून ध्वजवंदन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या आंदोलनात त्यांच्यासह रेल्वे बचाव सत्याग्रही सिंधू विल्हेकर, समर दुर्गे, अमर साबीर, प्रतीक नखाले, रमेश नखाले, सागर पाटील, प्रफुल राव, ऋषभ कोठारी, स्वप्नील जयस्वाल, तमिल शेख, अफरोज भाई, प्रवीण राठोड, अशोक शंभरकर, शंतनु शिरभाते, सागर कैथवास, अजय शेंडे, संदीप दुधाने, दुशेन हातागळे, अजय उपाध्याय, डॉ. धावडे, मोहम्मद फारुक बाबला, रोहित नागपुरे, सुनील हिवराळे आदी सहभागी झाले होते.