मनिष गुडधे.अमरावति
अमरावती, दि. ४ : अमरावतीला उपचार घेऊन बरे होऊन नागपूरला घरी परतलेल्या दोन रुग्णांचा ‘ओमायक्रॉन व्हेरिएंट’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता व दक्षता पालनाचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम म्हणाले की, नागपूर येथून आलेल्या तीन कोविडबाधित व्यक्तींना ते ओमायक्रॉन संशयित असल्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. दरम्यान, तिघांवर उपचार होऊन १० दिवसांचा विहित कालावधी पूर्ण झाला. त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.हे रुग्ण युगांडा येथून नागपूरला आले होते. ते नागपूर येथे पॉझिटिव्ह आले पण तेथून अमरावती येथे उपचारासाठी दाखल झाले. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये एका ३० वर्षीय पुरुषासह ६ वर्षीय बालकाचा समावेश आहे. दोघेही उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत व त्यांची प्रकृती चांगली आहे.ओमायक्रॉन आता अमरावतीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे सर्वानी सतर्क राहणे आवश्यक आहे, कोविड अनुरूप वागणूक ज्यात मास्कचा वापर, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे, तसेच लसीकरण आणि लक्षणे असल्यास तपासणी करणे या बाबी नागरिकांनी आवर्जून पाळाव्यात, असे आवाहन डॉ. निकम यांनी केले.