यवतमाळ, ता. 6 : पत्रकारांनी आपल्या आयुष्यात कधी नकारात्मक विचारांना थारा देऊ नये, नैराश्याला जवळ येऊ देऊ नये. सकारात्मक विचार करणारे लोकच नेहमी पुढे जातात. काळाच्या ओघात पत्रकारितेचे संदर्भ बदलले आहेत. मात्र, वृत्तपत्राची विश्वासार्हता आजही टिकून आहे. त्यामुळे पत्रकारांनी कर्तव्याप्रति सजग राहून संवेदनशीलता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी यांनी व्यक्त केले.
यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघा (र.न.5703) च्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त गुरुवारी (ता. सहा) येथील एमएसईबी एम्प्लॉईज फेडरेशनच्या सभागृहात पत्रकारदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रा. जोशी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे, ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे, टी. ओ. अब्राहम, अशोक गोडंबे, आरती गंधे, यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप खडेकर, ज्येष्ठ पत्रकार धनंजय खारोकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे
प्रा. जोशी म्हणाले की, सकारात्मक विचारसरणीच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे. पत्रकारांनी मूल्य जोपासत लेखनीच्या माध्यमातून सत्याची बाजू मांडली पाहिजे. रेडिमेड काही मिळत नाही. त्यासाठी कष्ट करावेच लागतात. त्यातच आयुष्याचा खरा आनंद असल्याचे प्रा. जोशी म्हणाले. यावेळी टी. ओ. अब्राहम, अशोक गोडंबे, धनंजय खारोकर यांनीही विचार व्यक्त केले. श्रमिकचे अध्यक्ष संदीप खडेकर यांनी प्रास्ताविक केले. केशव सवळकर यांनी संचालन केले. अमोल ढोणे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार राजकुमार भीतकर, नितीन भागवते, सहायक माहिती अधिकारी गजानन जाधव, अॅड. गिरिराज बैसानी, रवींद्र चांदेकर, अमोल शिंदे, प्रवीण देशमुख, सुहास सुपासे, सूरज पाटील, पवन लताड, रूपेश चाफलेकर, रवी चरडे, रवी राऊत, तुषार देशमुख, राहुल वासनिक, मनोज जयस्वाल, विजय गाडगे, महेश गंगोत्री, नंदकुमार गोगटे, संकेत सावंत, शिवानंद लोहिया, कल्पक वाईकर, आकाश रायबोले, नितीन राऊत आदींची उपस्थिती होती.
——–(…कोट…)
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुरुवात दर्पण वृत्तपत्र काढून बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. आजच्या काळात पत्रकारिता करणे अधिक जबाबदारीचे काम झाले आहे. प्रशासन व राजकीय क्षेत्रात पत्रकारांची दहशत नाही तर दरारा असावा लागतो. माध्यमविश्वात बदल होत असले तरी विश्वासार्हता टिकून आहे.
– दिनेश गंधे, ज्येष्ठ पत्रकार.
(…कोट…)
आजच्या काळात पत्रकारिता बदलली, संकल्पना बदलल्या आहेत. कोरोना काळात सर्वांनाच पत्रकारांचे महत्त्व आणि त्यांना किती जोखीम पत्करावी लागते, हे जनतेला कळले. कोरोना काळात सरकार व जनता यांच्यातील दुवा हा पत्रकारच होता. लिखाण ही कला आहे. या क्षेत्रात पैसा नाही, मात्र आयुष्यभराचा आनंद वंचित घटकांना न्याय मिळवून दिल्यास मिळतो.
-मनीषा साळवे,
जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ