(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी / यवतमाळ – आईला मोठ्या भावाने पैशाची मागणी केल्याच्या क्षुल्लक कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घाटी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. दीपक ज्योतीराम गेडाम (वय 25) रा. इंदिरा नगर, घाटी – घाटंजी असे मृतकाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी बाजाराच्या दिवशी आई बाजारात गेली असता मोठा मुलगा दीपक गेडाम याने आईला पैशाची मागणी केली. बाजार आटोपल्यानंतर घरी परतल्यावर आईने सदर प्रकार लहान मुलगा दिलीप याला सांगितला. त्या कारणावरून दीपक व दिलीप मध्ये वाद झाला व त्याचे पर्यावसान खुनात झाले. लहान भाऊ दिलीप गेडाम (वय 22) रा. इंदिरा नगर, घाटी – घाटंजी याने त्याचाच मोठा भाऊ दीपक ज्योतिराम गेडाम (वय 25) याच्या पोटात, छातीत व गळ्यावर चाकूने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या आईने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय घाटंजी व नंतर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
भीमराव कोवे यांच्या फिर्यादी वरून घाटंजी पोलिसांनी आरोपी दिलीप ज्योतीराम गेडाम विरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम, जमादार राहुल खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल वाढई आदी पुढील तपास करीत आहे.