सात वर्षांपासून 350 कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत!
महेंद्र गायकवाड
नांदेड – येथील गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्थेतील अस्थाई कर्मचाऱ्यांनी गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि गुरुद्वारा श्री लंगरसाहेबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले यांच्याकडे उपस्थित होऊन सेवेत करण्याची मागणीसाठी साकडे घातले. दोन्ही बाबाजींनी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा त्वरित पाठपुरावा करत बोर्डाच्या अध्याक्षासोबत फोनवर चर्चा करून कर्मचाऱ्यांची कैफियत मांडली.
वरील विषयी अधिक माहिती अशी की गुरुद्वारा सचखंड बोर्डात कार्यरत डेलीवेजस आणि बिलमुक्ता कर्मचारी मागील सहा ते सात वर्षापासून सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहा ते साढे सात हजार रूपये अल्पवेतनात काम करावे लागत आहे. मागील 2018 मध्ये गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका पार पाडल्या होत्या. त्यावेळी गुरुद्वारा बोर्डातील अस्थाई आणि बिलमुक्ता कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण मागील तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर जवाबदार व्यक्तींकडून सतत दुर्लक्ष्य करण्यात आले. बोर्डात मोठ्या संख्येत महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच सुशिक्षित युवकांचा देखील यात समावेश आहे. अगदी कोरोना संक्रमणाच्या कठीण काळात देखील या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता बोर्डाने नेमून दिलेले सर्व कर्तव्य बजावले. मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 4.15 वाजता सुमारास बोर्डातील अस्थाई आणि बीलमुक्ता कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि संतबाबा बलविंदरसिंघजी यांची संयुक्तरीतिया भेंट घेऊन आपल्या समस्यावर चर्चा केली. तसेच वरील विषयी मार्ग काढण्याची विनंती केली. यावर संतबाबा कुलवंतसिंघजी आणि संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास यांच्याशी फोनवर चर्चा करून सर्व पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आवाहन केले. स. भूपिंदरसिंघ मिनहास यांच्याशी चर्चेनंतर दोन्ही बाबाजीं कर्मचाऱ्यांना माहिती दिली की बोर्ड अध्यक्ष मिनहास हे येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नांदेडला येत असून त्यावेळी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येईल. असे आश्वासन स्वतः मिनहास यांनी दिल्याचे बाबाजींनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांनी बाबाजींचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता स. लखनसिंघ लांगरी यांनी बाबाजींना विषयाची माहिती करून दिली. सर्वकर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांना सुद्धा निवेदनाची प्रत देऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न उचलून धरण्यासाठी विनंती केली.
……….
बाबाजींचे फोन अधिकारी नॉट रिचेबल :
कर्मचाऱ्यांचे विषय एकून घेतांना प्रस्तुत विषयावर चर्चा करण्यासाठी बोर्डातील एका प्रभारी अधिकाऱ्यास उपस्थित राहण्याचे संदेश दिले गेले होते. पण ऐन वेळी बोर्डातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपले मोबाइल फोन बंद करून ठेवलेत. यामुळे कर्मचारी वर्ग चांगलाच अस्वस्थ झाला होता.