Home राष्ट्रीय पाकिस्तानच्या खोट्या वृत्त प्रसारणावर भारताचा प्रहार

पाकिस्तानच्या खोट्या वृत्त प्रसारणावर भारताचा प्रहार

446

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तान अर्थसहाय्यित खोटी वृत्त नेटवर्क केली ब्लॉक

भारतविरोधी खोटी वृत्ते पसरवल्याबद्दल 35 यूट्यूब चॅनेल्स, 2 संकेतस्थळे ब्लॉक

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी  – डिजिटल मीडियावर समन्वित पद्धतीने भारतविरोधी बनावट वृत्त पसरवण्यात गुंतलेल्या 35 यूट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि 2 संकेतस्थळे ब्लॉक करण्याचे आदेश  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या यूट्यूब खात्यांची एकूण सदस्य संख्या 1 कोटी 20 लाखांहून अधिक आहे आणि त्यांच्या  व्हिडिओजना 130 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. याव्यतिरिक्त, इंटरनेटवर भारतविरोधी चुकीची माहिती पसरवण्यात समन्वित सहभागाबद्दल दोन ट्विटर खाती, दोन इंस्टाग्राम खाती आणि एक फेसबुक खातेदेखील  सरकारने ब्लॉक केले आहे.

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 च्या नियम 16 अंतर्गत जारी केलेल्या पाच स्वतंत्र आदेशांनुसार, मंत्रालयाने ही पाकिस्तान स्थित सोशल मीडिया खाती आणि संकेतस्थळे  ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय गुप्तचर संस्था या सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाइट्सवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या आणि त्यांनी तात्काळ कारवाईसाठी ती चिन्हांकित केली होती.

काम करण्याची पद्धत : समन्वित अपप्रचार नेटवर्क्स

मंत्रालयाने ब्लॉक केलेली सर्व 35 खाती पाकिस्तानातून कार्यरत होती आणि चार समन्वयित अपप्रचार नेटवर्क्सचा  भाग होती.

ही सर्व नेटवर्क्स खोटी वृत्त पेरून भारतीय प्रेक्षकांची दिशाभूल करणे या एकाच ध्येयाने चालवली जात असल्याचे दिसून आले. नेटवर्कचा भाग असलेल्या वाहिन्या कॉमन हॅशटॅग आणि समान संपादन शैली वापरत होत्या. त्या सामान्य व्यक्तींद्वारे संचालित होत्या आणि एकमेकांच्या सामग्रीचा प्रचार करत होत्या. काही यूट्यूब वाहिन्या  पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिन्यांचे निवेदक चालवत होते.

सामग्रीचे स्वरूप

मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या यूट्यूब वाहिन्या, संकेतस्थळे  आणि इतर सोशल मीडिया खाती पाकिस्तानकडून  भारताशी संबंधित संवेदनशील विषयांवर भारतविरोधी खोटी वृत्ते पसरवण्यासाठी वापरल्या जात होत्या. यामध्ये भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध यासारख्या विषयांचा समावेश आहे. माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबाबत यूट्यूब चॅनेलवरून मोठ्या प्रमाणावर खोटी वृत्त पसरवण्यात आल्याचे दिसून आले. या यूट्यूब वाहिन्यांनी पाच राज्यांतील आगामी निवडणुकांच्या लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यासाठी आशय पोस्ट करण्यास सुरुवात केली होती.

या वाहिन्यांनी फुटीरतेला खतपाणी घालणारा, धर्माच्या आधारे भारताचे विभाजन करणारा आणि भारतीय समाजातील विविध समुदायांमध्ये वैर निर्माण करणाऱ्या  सामग्रीचा प्रचार केला.

ही कारवाई, सरकारने अलीकडेच डिसेंबर, 2021 मध्ये 20 यूट्यूब वाहिन्या आणि 2 संकेतस्थळे ब्लॉक केल्याच्या अनुषंगाने आहे. तेव्हा माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर अशा भारतविरोधी खोट्या वृत्त जाळ्यांवर कारवाई करण्यासाठी पहिल्यांदा केला गेला.