प्रभावी अभिनयाने रंगकर्मींनी मिळवली रसिकांची दाद.
यवतमाळ / प्रतिनिधी
दोन वर्षांच्या कोरोना नंतर प्रथमच नाट्यगृहांची दारे उघडल्यानंतर नाट्यरसिकांना मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच काल यवतमाळ येथील “अस्मिता रंगायतन” तर्फे लेखक श्याम मनोहर लिखित “प्रियांका आणि दोन चोर” या नाटकाचा यवतमाळात पहिला प्रयोग पार पडला. कोरोना काळानंतर अस्मिता रंगायतनच्या पहिल्या नाट्य प्रयोगाचा उपक्रम रसिकांच्या प्रतिसादात रंगला. लेखक श्याम मनोहर लिखित “प्रियंका आणि दोन चोर” या नाटकाचे प्रभावी सादरीकरण करून रंगकर्मीनी रसिकांची दाद मिळवली.
अनेक श्रीमंत कुटुंबांत मोलकरीण म्हणून काम करणारी प्रियांका आणि ती राहत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या गच्चीवर बिल्डरच्या अपरोक्ष तिने भाडे घेऊन राहायला दिलेले दोन चोर अशी तीन पात्रे या नाटकात आहेत. हे तिघेही अर्थातच गरीब आहेत. छोटे आहेत. छोट्या लोकांची स्वप्नेही तशी छोटीच असतात तशीच ती या तिघांचीही आहेत. घरी महिनाभराचा किराणा भरता येणं ही प्रियांकाच्या आनंदाची परिसीमा आहे तर सोनसाखळी चोरायची असा निश्चय करणाऱ्या चोराला ती मिळत नाही ही त्या चोराच्या दुःखाची परिसीमा आहे. तिसऱ्या चोराचीही अशीच छोटोमोठी स्वप्नं आहेत. पण छोट्या लोकांच्या छोट्या अपेक्षाही नियती पूर्ण होऊ देत नाही, असा गंभीर आशय मांडणारं हे नाटक आहे.
या नाटकात तीन पात्रांचा सामावेश असून यातील प्रियांका ही भूमिका ऐश्वर्या देशमुख यांनी तर दोन चोरांमध्ये अमित राऊत व लखन सोनूले यांनी साकारली होती. काल दिनांक २२ जानेवारी रोजी धामणगाव रोड वरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून या नाटकाचा प्रयोग पार पडला. अनेक श्रीमंतांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणारी प्रियंका आणि ती राहत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या गच्चीवर बिल्डरच्या अपरोक्ष तिने भाडे देऊन राहायला दिलेले दोन चोर अशी तीन पात्रे नाटकात आहेत. हे तिघेही अर्थातच गरीब आहेत. छोटे आहेत. छोट्या लोकांची स्वप्नेही तशीच छोटी असतात. हेही या नाटकातून प्रकर्षाने दाखविण्यात आले.
या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन यवतमाळ येथील जेष्ठ नाट्यकर्मी अशोक अष्टीकर यांनी केले असून या नाटकात मुख्य भूमिकेत ऐश्वर्या देशमुख, अमित राऊत, लखन सोनुले यांनी भूमिका पार पडलेले आहेत. तर नेपथ्य मुन्ना गहरवाल, सतीश पवार तर या नाटकाचे यशस्वीतेसाठी चैतन्य कांबळे, अशोक कार्लेकर, सोमन गटलेवार, विशाल ठोंबरे, आशिष मदनकर, प्रसाद गायकी, कु. मंजुषा खर्चे, अरुण फटिंग, प्रविण सोनवाल,प्रज्योत चौकाडे यांनी अथक परिश्रम घेतले…..