डॉ. विनय काटे यांची फेसबुक पोस्ट
सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. 2000 रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते. हिंदू धर्मात तर सुरा (दारू) प्राशन करणारे ते सुर (देव) असा एक समज आहे.
सुपर मार्केटमध्ये वाइन मिळाली म्हणून महाराष्ट्रचा मद्यराष्ट्र व्हावा हे म्हणजे ग्रँट रोडला वेश्यावस्ती झाली म्हणून अख्खी मुंबई वेश्यागमन करायला लागली इतके हास्यास्पद मत आहे. तुमच्या गावात पोलीस चौकी आहे म्हणून तुम्ही कायदे, वाहतुकीचे सिग्नल मोडायचे सोडले का? एवढे सोज्वळ आहात का तुम्ही? आणि भेंडी जर तुम्ही एवढे सोज्वळ आहात तर तुमच्यासमोर वाइन ठेवली म्हणून तुम्ही दारुडे बनणे शक्य आहे?
प्रॉब्लेम दारुमध्ये नाहीये… प्रॉब्लेम इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेत, जातीयवादी आणि कट्टर धर्माभिमानी संस्कारात आहे. हुंड्यासाठी सुनेला पेटविणाऱ्या सासू दारू पीत नसतात आणि गावात एखाद्या दलित स्त्रीची नग्न धिंड काढताना खानदानी घरातले पुरुष आणि स्त्रिया दारू न पिता त्या कृतीला प्रेक्षक बनून मूकसंमती देतात. दारूला बदनाम करण्यापेक्षा स्वतःच्या मेंदूत भरलेला पुरुषी अहंकार, जातीय माज आणि धार्मिक विद्वेष बाजूला काढून फेका.
दारू पिणाऱ्या जिनाने विरोधक म्हणून गांधींना गोळी मारली नाही, दारू न पिणाऱ्या नथुरामने मारली. आमचे भीमसेन जोशी दारू पिऊन संतांची भजने स्वर्गीय आवाजात आणि भावात म्हणायचे. एवढं कळलं तरी पुरेसे आहे.
चिअर्स!!!
– डॉ. विनय काटे