घाटंजी / अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील ग्रामपंचायत सरपंच वर्षा भिमराव कणाके हिला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सरपंच वर्षा कणाके हिच्या तक्रारीवरून चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार विरुद्ध अँट्रोसिटी अँक्ट 3 (1) (r), 3 (1) (s) व भादंवि 504 नुसार पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहे.
पोलीस सूत्रानुसार, सरपंच वर्षा कणाके हिला ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारात सहभागी न करता सरपंच यांची सही व शिक्याचा खोट्या पद्धतीने वापर करून ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतले. सदरची लेखी तक्रार सरपंच वर्षा कणाके हीने 5 एप्रिल 2021 रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यवतमाळ यांचे कडे केली होती. 13 सप्टेंबर 2021 रोजी चिखलवर्धा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने गावातील काही महीला सरपंच यांचेकडे तक्रार घेऊन आल्या होत्या. 14 सप्टेंबर 2021 रोजी पाणी टंचाई असल्याने मी स्वतः, ग्रामपंचायत सदस्य कुसुम चव्हाण व योगिता आत्राम आम्ही तिघेही गावात जात होते. आम्ही मराठी शाळे जवळुन जात असतांना सकाळी 10.40 वाजता उपसरपंच आकाश नडपेलवार याची भेट झाली. या वेळी उपसरपंच आकाश नडपेलवार यांस प्रकल्प कार्यालयात दाखल केलेल्या ठरावाबाबत सरपंचाने विचारणा केली की, ग्रामपंचायत ठरावावर खोटी सही व खोटा शिक्का कां मारला म्हणून विचारणा केली असता, तेव्हा उपसरपंच नडपेलवार याने म्हटले की, “गोंडाळे कितीही शिकले तरी सुधरत नाही. तुमच्या सारखे गोंड मी खुप पाहीले अशी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले व जिवे मारण्याची धमकी दिली.” तसेच तुझ्याने जे होते ते करं, आदिवासी कितीही शिकले तरी प्रगती होत नाही, असे म्हणुन सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली, अशा तक्रारी वरुन आरोपी उपसरपंच आकाश नडपेलवार विरुद्ध पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी अँट्रोसिटी अँक्ट व भादंवि कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. सदरच्या ब वर्ग समरी फायनल प्रकरणात विशेष न्यायाधिश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांच्या न्यायालयात 11 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सदर प्रकरणात शासनाकडुन सहाय्यक सरकारी वकील अँड ए. के. वर्मा हे काम पाहत आहे. तर फिर्यादी सरपंच वर्षा कणाके यांच्यातर्फे अँड. नरेंद्र बी. मेश्राम हे न्यायालयात बाजू मांडणार आहे.
⚫➡️ चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके हिच्या तक्रारीवरून पारवा पोलीस ठाण्यात अँट्रोसिटी अँक्ट व भादंवि नुसार गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणात सखोल चौकशी केली असता तपासाअंती तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर प्रकरणात विशेष न्यायाधिश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ न्यायालयात “ब” वर्ग समरी फायनल दाखल केला आहे.
प्रदीप पाटील
उप विभागीय पोलीस अधिकारी,
पांढरकवडा