आयता येथे सात्वंनासाठी गेलेल्या पत्रकार संघासमोर बापाचा हंबरडा..!
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी : 9 मार्चचा सूर्य आयता येथील जैस्वाल कुटुंबीयांसाठी काळ रात्र घेऊनच उगवला. कुणालाही कल्पना नव्हती की, या दिवशी आयता या गावात काही आक्रित घडेल, तद्वतच आपल्या कुटुंबाचा सुख, समाधान व शांती साठी पुण्यार्जना करीता निघालेल्या पतीची भावनासुद्धा परमेश्वराच्या लक्षात आली नाही. कदाचित त्यामुळेच ते सुद्धा दुःखद प्रसंगी धावून आले नाही.
मात्र पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी उध्वस्त झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी कंबर कसली व माणुसकीची हाक म्हणून कोरोना काळात उद्यागधंदे बुडाले आहेत. रोजगाराच्या वाटा धुसर झाल्या अशा संकट काळात आपल्या जिवाभावाची माणसे गर्भवती पत्नी काजल व अंगा खंद्यावर खेळणारी 5 वर्षाची चिमुकली वैभवलक्ष्मी कायम स्वरुपी नजरेआड होणे या पेक्षा मोठे दुःख कोणाच्या वाटेला येवू नये. अशी हृदयदावक घटना घडली.
त्यामुळे सदर कुटुंबियांस मदत करण्याचे आवाहन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयता येथे जाऊन विनोद जयस्वाल यांची भेट घेतली व त्यांना मदत निधी म्हणून 5 हजार एकसे एक रुपये भेट दिली. त्यावेळी त्यांचे उर भरून आले. “साहेब, खरंच माझी मुलगी खूप चांगली होती हो. असा हंबरडा त्यांनी फोडल्यानंतर उपस्थित सर्व पत्रकाराचे डोळे पाणावले.” त्यातच त्यांनी रेकॉर्डिंग केलेला मुलीचा व्हिडिओ दाखविला. ते पाहून वातावरणात नीरव शांतता पसरली, आणि सर्व सुन्न झाले.
सुरुवातीला पोहोचल्यानंतर घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांनी त्यांच्या उध्वस्त झालेल्या घरात प्रवेश केला.
प्रवेश करताच आमचे स्वागत करपट वासानेच केले. अगोदरच्या दिवशी हसी खुशीने संपन्न असलेले घर आज निर्जीव वाटत होते. त्या घरातल्या प्रत्येक वस्तू जणू प्रत्येक क्षणाची आठवण करून देत होते. विशेष म्हणजे वैभव लक्ष्मीचे जीवापाड जपून ठेवलेले खेळणे अस्ताव्यस्त पडलेली दिसून येत होते. ज्या खेळण्यामुळे तिचा घात झाला. ते जणू आम्हाला वेळोवेळी त्या क्षणाची आठवण करून देत होते. तिचे कपडे व संसारोपयोगी लागणारे सर्व साहित्य झालेल्या प्रसंगाची साक्ष देत होते. एवढेच काय तर त्यादिवशी त्यांनी बनवलेले जे पदार्थ आहे ते त्याच जागेवरच होते. ते पदार्थ सुद्धा घरच्या सदस्यांची वाट पाहत होते. कदाचित त्यांनाही वाटत असावे की, त्यांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी आम्ही सज्ज आहो, मात्र ते अद्याप कां आले नाही, याचेही दुःख कदाचित त्यांना होत असावे. निर्मनुष्य असलेल्या या घरात आता केवळ त्यांच्या आठवणीचा इतिहास जमा झालेला होता.
सदर सर्व घटनाक्रम पत्रकारांच्या डोळ्यासमोर आला असता, त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी विनोद जैस्वाल यांचा निरोप घेतला. मात्र या बिकट परिस्थितीमध्ये सावरण्याकरिता आर्थिक थैर्य देणारे पारव्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचे कृतज्ञता पूर्वक आभार मानायला ते विसरले नाही. सोबतच पत्रकारांनी सुद्धा ठाणेदारांचे मनापासून आभार मानले.
या प्रसंगी घाटंजी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे, सचिव राजू चव्हाण, कोषाध्यक्ष सागर सन्मनवार, पांडुरंग निवल, लोकदुतचे संतोष पोटल्लीवार, प्रदीप प्रदीप वाकपैजन, नमो महाराष्ट्रचे अरुण कांबळे, योगेश ढवळे, प्रेमदास चव्हाण, अस्लम कुरेशी, रमेश मादस्तवार, मलैय्या खंदारे, पारिवारिक सदस्य कैलास उकले आदी उपस्थित होते. सोबतच लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विठलराव कांबळे, चंद्रकांत ढवळे, पुढारीचे अयनुद्दीन सोलंकी, सुधाकर अक्कलवार, नवराष्ट्रचे आकाश बुर्रेवार, कुणाल तांगडे यांचे आर्थिक सहकार्य सुद्धा लाभले.