Home विदर्भ दर्यापूरच्या माजी उपसभापती पिता-पुत्रासह चौघांवर गुन्हे दाखल . अंकुश दाळु. नकुल सोनटक्केवरील...

दर्यापूरच्या माजी उपसभापती पिता-पुत्रासह चौघांवर गुन्हे दाखल . अंकुश दाळु. नकुल सोनटक्केवरील हल्ला भोवला : येवदा पोलिसांची कारवाई.

120

अमरावती / दर्यापूर : पंचायत समिती दर्यापूरचे माजी उपसभापती पिता-पुत्रासह चौघाविरुद्ध २५ मार्च रोजी येवदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दर्यापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर इंगळे, गोलू इंगळे, विलास मोहोळ, सचिन मोहोड अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी (ता.25) दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नकुल सोनटक्के यांनी येवदा, वडनेर गंगाई येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही आहे. प्रशासन नागरिकांना अजून किती छळणार आहे. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. उन्हाळा सुरू झाल्याने प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा, असा प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न जिव्हारी लागल्याने आरोपींनी नकुल सोनटक्के यांच्याशी अरेरावी केली. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने सोनटक्के यांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर येवदा पोलिसांनी उपसभापती रामेश्वर इंगळे, पुत्र गोलू इंगळे यांच्यासह चारही आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाब चौपगार करत आहेत.
विविध संघटना समर्थनार्थ मैदानात नकुल सोनटक्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ति पक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, चर्मकार महामंडळ यासह अन्य संघटना आता मैदानात उतरनार असल्याची माहिती आहे. तसेच या घटनेचा निषेध नोंदवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मंजिश खोड़े यांनी दिली.