Home उत्तर महाराष्ट्र पोषण पंधरवडा कार्यक्रम निरोगी भारत बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यास मदत करेल...

पोषण पंधरवडा कार्यक्रम निरोगी भारत बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यास मदत करेल – रुबल अग्रवाल

231


प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे द्वारे आयोजित ‘कुपोषण- आव्हाने व उपाय’ यावरील वेबिनार संपन्न

पुणे, 4 एप्रिल 2022

 
कुपोषण- आव्हाने व उपाय यासारखे वेबिनार, आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आपल्या पंतप्रधानांनी स्वस्थ भारत निर्माण करण्याचा दिलेला संदेश पुढे नेत आहेत, असे उद्गार महिला आणि बाल विकास विभाग आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काढले. 

पोषण पंधरवडा 2022 निमित्त प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुपोषण: आव्हाने व उपाय वेबिनारमध्ये त्‍या बोलत होत्या. 
 
यावेळी बोलताना सरकारी संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो आपल्या परंपरा, लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या. 

श्रीमती शर्मा पुढे म्हणाल्या की, आम्ही प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोमध्ये मनोरंजक पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे संदेश दीर्घकाळ टिकतो. आम्ही विशेषतः महिला आणि मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. 

यावेळी बोलताना उपायुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सह प्रकल्प समन्वयक, पोषण अभियान, विजय क्षीरसागर म्हणाले की, एकात्मिक बाल विकास योजना 1975 मध्ये महाराष्ट्रात अमरावती आणि धारावीमध्ये सुरू झाली. आज महाराष्ट्रात असे ५५३ प्रकल्प आहेत. 

पूरक पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण आणि आरोग्य शिक्षण, बालवाडी शिक्षण आणि संदर्भ सेवा या ICDS अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहा सेवा असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. 

553 बाल विकास प्रकल्प अधिकारी, 36 जिल्हा कार्यक्रम अधिकारी, 1,10,000 हून अधिक अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ICDS कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मदत करतात, असे क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

कुपोषण हे फक्त आदिवासी भागापुरते मर्यादित नाही; मेट्रो शहरांमधील झोपडपट्टी भागातही मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके आढळून येत आहेत. 7.26% मुले मध्यम प्रमाणात कुपोषित आहेत आणि 1.29% मुले गंभीर कुपोषित आहेत. कुपोषणाची कारणे गरिबी, जागरूकतेचा अभाव, कमी वयात विवाह, स्वच्छतेचा अभाव, रक्तक्षय (एकूण महिलांच्या ६०%) अशी आहेत, असे क्षीरसागर पुढे म्हणाले. 

गरोदर मातांमध्ये पोषणाचा संदेश देण्यासाठी अन्न प्राशन दिनासारखे समुदाय आधारित कार्यक्रम अंगणवाडी सेविकांद्वारे कसे साजरे केले जातात याची माहिती पोषण अभियान उपायुक्त विजय क्षीरसागर यांनी दिली; तसेच वडिलांसाठी आयोजित सुपोषण दिनासारख्या अभिनव उपक्रमांची देखील माहिती त्यांनी दिली. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी यावेळी पोषण जागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच महिलांवरील कामाचे ओझे कमी करण्यासाठी हर घर जल या उपक्रमात सोलापूर जिल्हा कसे काम करत आहे, याची माहिती दिली.

कुपोषण कमी करण्यासाठी पारंपारिक उच्च प्रथिनयुक्त अन्न वापरण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचे शेख यांनी सांगितले. 

मेळघाट हे संपूर्ण भारतात कुपोषणासाठी ओळखले जाते, तथापि आम्ही कुपोषणाचा सामना करण्यासाठी किशोरवयीन मुलींमध्ये जागृती करण्याचे लक्ष्य ठरविले आहे. त्याचबरोबर 0-1 महिन्यात 52% बालमृत्यू होतात, ते थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ कैलाश घोडके यावेळी म्हणाले.