पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थान असलेले मातृतिर्थ सिंदखेडराजा या तालुक्यातील साखरखेर्डा हे शहर तालुक्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर दूर आहे. साखरखेर्डा पंचक्रोशीतील जनतेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची साखरखेर्डा तालुक्याची मागणी सरकार दरबारी पडून आहे. या परिसरातील जनतेला तालुक्याला जाऊन एखादे काम करायचे असल्यास अंतराच्या कारणामुळे संपूर्ण दिवस गमवावा लागतो. सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालय , पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी ,तालुका क्रषी अधिकारी कार्यालय , इत्यादी सर्व कार्यालये साखरखेर्डा परिसरापासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे साखरखेर्डा परिसरातील सर्वसामान्य जनता शासनाच्या विविध योजनांपासून अनेक वेळा वंचित राहते. साखरखेर्डा परिसरातील सर्वसामान्य माणूस सहजासहजी तालुक्याला जाऊ शकत नाही. साखरखेर्डा परिसरातील सर्व सामान्य माणसाला सिंदखेडराजाला जाण्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात. एका फेरीमध्ये कोणतेच काम होत नाही. ये जा करण्यासाठी पुरेशा वाहनांची सोय उपलब्ध नसते. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये असलेले दलाल साखरखेर्डा परिसरातील लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची लूटमार करतात ,सर्वांना माहित आहे. सिंदखेडराजा तालुक्याला जायचे असल्यास साखरखेर्डा भागातील लोकांना भरपूर अडथळे पार पाडावे लागतात. सकाळी सिंदखेडराजा ला गेलेला माणूस रात्री उशिरा घरी पोहोचतो. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील लोक तालुक्याअभावी अनेक प्रकारच्या यातना सहन करीत आहेत. आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था तालुक्याअभावी या भागातील जनतेची झालेली आहे.
साखरखेर्डा शहराला ऐतिहासिक , पौराणिक व धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे. लिंगायत धर्माचे श्रीमत्जगद्गुरु स्वामी पलसिद्ध महाराज यांचे धर्मपीठ याच भूमीवर विराजमान झालेले आहे. त्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार साखरखेर्डा नगरीच्या पवित्र भूमीवरून सातत्याने होत आहे. तसेच प. पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांची कर्मभूमी व समाधी याच शहरात वसलेली आहे. त्यांचा शिष्य संप्रदाय भारतभर विखूरलेला आहे. साखरखेर्डा हे शहर भोगावती नदीच्या तीरावर वसलेले असून भग्नावस्थेत असलेला मोगलकालीन भूईकोट किल्ला इतिहासाच्या पाऊलखुणा जपत कसाबसा तग धरून उभा आहे. काळ्या कातळात चिरेबंदी दगडी बांधकाम असलेली इतिहासकालीन जामा मशीद दिमाखात उभी आहे. मोगल आणि निजाम यांच्या मध्ये झालेली ऐतिहासिक घनघोर लढाई याच शहराच्या माळरानावर झालेली आहे. त्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या सहा सरदारांच्या समाध्या याच भूमीवर स्थिरस्थावर झालेल्या आहेत. तत्कालीन राजेरजवाड्यांच्या संरक्षणासाठी असललेल्या राजपूत, बुंदेले, रोहिले, पठाण, नायकवाडी या शूरवीर सरदारांचे अनेक वंशज याच साखरखेर्डा शहरात आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांचा इतिहास आज लोप पावत चालला आहे. तसेच अठरापगड जातीधर्माचे बांधव गुण्यागोविंदाने येथे नांदतात. या शहराची लोकसंख्या जवळपास पंचवीस हजारांवर आहे.
साखरखेर्डा शहराला तालुक्याचा दर्जा दिल्यास मलकापूर पांग्रा , देऊळगाव माळी ,शेंदूरजन , हिवरा आश्रम , सवडद, लव्हाळा, लोणी, मोहाडी, राताळी, गुंज ,वरोडी , गोरेगाव इत्यादी चाळीस ते पन्नास गावे या तालुक्यात समाविष्ट होऊ शकतात. या गावांची कायमची सोय होऊ शकते.
साखरखेर्डा भागातील जनतेला सिंदखेडराजाच्या मानाने मेहकर आणि चिखली ही दोन तालुक्याची ठिकाणे फक्त पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहेत. जाण्यायेण्यासाठी भरपूर सुविधा आहेत. रस्तेही छान आहेत. मेहकर आणि चिखली या दोन्ही ठिकाणी मोठी व्यापारी पेठ आहे. साखरखेर्डा तालुका निर्माण होत नसेल तर या भागातील लोकांना मेहकर किंवा चिखली तालुक्याला जोडण्याचा पर्याय चांगला आहे. सन 1982 अगोदर साखरखेर्डा भागातील बरीचशी गावे मेहकर तालुक्याला जोडलेली होती. 1982 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. ए.आर. अंतुले साहेबांच्या काळात मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान असल्यामुळे सिंदखेडराजा हा नवीन तालुका अस्तित्वात आला .तेव्हापासून साखरखेर्डा भागातील अनेक गावांना मेहकर तालुक्यापासून तोडून सिंदखेडराजा तालुक्याला जबरदस्तीने जोडण्यात आले.
वास्तविक पाहता सिंदखेडराजा हा तालुका व्हावा ही साखरखेर्डा भागातील लोकांची कधीच मागणी नव्हती. तरीही त्यांची सहमती विचारात न घेता एका रात्रीत साखरखेर्डा परिसरातील अनेक गावांना जवळच्या मेहकर तालुक्यापासून तोडून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदखेडराजा या नवीन तालुक्याला जोडण्यात आले. हा या भागातील लोकावर झालेला फार मोठ अन्याय होता आणि आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून साखरखेर्डा भागातील अनेक गावांतील भोळेभाबडे लोक हा अन्याय निमूटपणे सहन करीत आहेत.
गेल्या कित्येक दशकांपासून साखरखेर्डा तालुका निर्मितीचा यक्षप्रश्न शासन दरबारी लोंबकळत पडला आहे. साखरखेर्डा शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी युती सरकारच्या काळात 1998 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी सरांची वर्षा निवासस्थानी मा. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांच्या नेतृत्वात एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यावेळी या शिष्टमंडळामध्ये साखरखेर्डा परिसरातील सर्वपक्षीय बहुसंख्य नेते मंडळी सहभागी झाली होती. त्यावेळी या शिष्टमंडळामध्ये मा वसंतराव मगर, मा. रामभाऊ जाधव , मा.रविंद्र पाटील, मा.तेजराव बापू देशमुख, मा.एम. के.गवई सर, मा.डी. एन. गवई सर , मा. नारायण खरात इत्यादी नेतेमंडळी सहभागी झाले होते. आज या घटनेला जवळपास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही.
परंतु आता मात्र एक संधी आयतीच चालून आलेली आहे. मा. ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे केबिनेट मंत्री तसेच बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री पदावर सन्मानाने विराजमान झालेले आहेत. त्यांच्या हातून हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो. साखरखेर्डा परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व सर्वसामान्य जनतेने साहेबांना गळ घातल्यास साहेब योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन साखरखेर्डा तालुक्यावर शिक्कामोर्तब करू शकतात. वर्षानुवर्षांपासून उराशी बाळगलेले साखरखेर्डा तालुका निर्मितीचे स्वप्न साकार होऊ शकते. सर्वसामान्य जनता वर्षानुवर्षांपासून भोगत असलेल्या हालापेष्टांना पूर्ण विराम मिळू शकतो. गरज आहे फक्त आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीची.
🙏🏾🙏🏾
टी.के.देशमुख
साखरखेर्डा ता. सिं. राजा जि. बुलडाणा दि.28.01.2020