राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पालक शिक्षक मेळावा संपन्न
प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगांवराजा :-आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक गुणवत्तेवर बरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शाळेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राजलक्ष्मी स्कूल नेहमी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केले.
वार्षिक परीक्षेच्या निकालानिमित्त पालक-शिक्षक मेळाव्यात डॉ.शेळके बोलत होते. याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकांना संबोधित करताना डॉ. शेळके यांनी शाळेचा संपूर्ण अहवाल पालकासमोर मांडला. कोरोनाच्या कठीण काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पुढील शिक्षणासाठी नांदेड, लातूर, कोटा याठिकाणी आता जाण्याची आवश्यकता नसून येथेच त्याच दर्जाची शैक्षणिक सुविधा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदेश शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांचा समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी शिक्षक पालक यांची एक समिती गठीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आयोजित पालक शिक्षक मेळाव्यामध्ये पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन पत्रकाचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिक्की कांबळे, सूत्रसंचालन शृतिका शर्मा तर आभार प्रदर्शन अमित घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.