1993-94 ला विवेकानंद शाळेतून बाहेर पडलो. शाळा म्हटले की प्रकर्षाने पहिली दोन चार नावे आठवतात, त्यातलं अग्रणी नाव म्हणजे श्री उमेश दामोदर वैद्य ज्यांना शाळेत आम्ही उ.दा. सर म्हणायचो. शाळेत दोन वैद्य सर होते त्यामुळे अनेकजण उ.दा. सरांना मोठे वैद्य सरही म्हणायचे. खरोखर सेवा, शिस्त, शिक्षा, संस्कृती, संस्काराचा यज्ञ आजन्म तेवणारं मूर्तिमंत उदा. वैद्य आणि वैद्य सरच असावे.
सरांच्या नावाआधी ‘आदर्श’ लिहण्यासाठी हात डळमळतो कारण आज ‘आदर्श’ शब्दही डागाळल्याने सरांच्या कारकिर्दीपुढे हा शब्द थिटा वाटतो. हे यासाठीही ठासून सांगावे लागेल कारण आजपर्यंत सरांनी कधीही शासनाकडे कुठल्याही पुरस्काराकरिता अर्ज केला नाही. ना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीच्या शिफारसीकरिता व्यवस्थापनाकडे कधी आर्जव केली.
हजारो कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी असूनही कधी प्रसिद्धीचा प्रपंच त्यांनी केला नाही. आज बहुतेक सिद्धांत हे शब्दातच दिसतात मात्र सरांनी सिद्धांताशी कधीच तडजोड केली नाही. सर फक्त शिस्त सांगून थांबले नाही तर त्याची स्वतः अंमलबजावणी केली. अनुदानित शाळेतली नोकरी तसेच सर्व सुख संपदा अनुभवायची क्षमता असतानाही चैनीच्या वस्तूंचा गाजावाजा न करता त्याग करणाऱ्या उ.दा. सरांच्या डिक्शनरीत मी आणि माझे हे शब्द कधीच अनुभवले नाहीत. सरांचा स्पष्टवक्तेपणा आणि मोकळा स्वभाव हा त्यांच्या वाणीप्रमाणेच सरळ, सहज व कुणालाही भावणाराच होता. सरांनी अनेक संस्थांचे शिरस्थ कार्य केले मात्र त्यांच्या वागण्या बोलण्यात कुणालाही एककल्लीपणा आढळला नाही.
सरांचा आशीर्वाद लाभण्यासाठी, त्यांचे ज्ञानसागरातील शिंपले वेचण्यासाठी व मायमराठी प्रमाणभाषा श्रवण्यासाठी गुरुभेटीचा मोह मला कधी आवरला नाही. त्यामुळे वर्षातून एकदोन वेळा आवर्जून सरांकडे जायचो. प्रत्येक भेटीत सरांकडे राजगिऱ्याचा लाडू मिळायचा. अगदी सरांच्या निधनाच्या एक आठवडा पहिले सरांच्या घरी गेलो असता माझ्या मुलांना राजगिरा लाडू मिळालेत. मात्र सर घरी नव्हते ते संजीवन हॉस्पिटलला आयसीयूमध्ये असल्याचे कळाले. रुग्णालयात सरांची भेट झाली, सरांनीही नेहमीप्रमाणे विचारपूस केली. मात्र हीच भेट अंतिम ठरेल असे वाटले नाही. माझ्या मुलांना माझ्या गुरूंची भेट करून देण्याची इच्छा अपूर्ण राहिली. कारण मुलं रुग्णालयात सोबतच होती मात्र त्यांना डॉक्टरांनी आयसीयूत येऊ दिले नाही.
सरांचं निवासस्थान चिरंतन ध्यानी असेल अशी ऊर्जा तिथं मिळायची.
सरांच्या घरी त्यांच्या आचारविचारांना शोभेल अशी अगदी मोजक्या जीवनावश्यक वस्तूंचीच थाटणी असायची. भारतीय बैठक आणि चैनीची कुठलीच ऐहिक सोयसुविधा दिसणार नाही, त्यावरूनच त्यांची वाणी आणि कृती एक होती, सरस्वतीचीच होती हे प्रकर्षाने जाणवायचे. शिक्षणाच्या बाजारीकरणावर सरांचा फार क्रोध होता मात्र हा क्रोध कधी सरांनी आक्राळ विक्राळ मांडला नाही. मनातली सल ते किती सहज, हसत खेळत, स्पष्ट पण सौम्य, मृदु पण ठोस मांडायचे. त्यावरूनच ते आतून बाहेरून एकच असल्याचे कळायचे.
सायकलने किंवा पायदळीच सरांची दिनचर्या असायची. अगदी तंतोतंत म्हणजेच ‘साधी राहणी उच्च विचार’ हा त्यांच्या जणू जगण्याचा अविभाज्य अंग होता. पांढरा सदरा आणि थोडा आखूड पैजामा हाच त्यांचा शेवटपर्यंतचा नित्य पेहराव होता. शाळेत आल्याबरोबर प्रवेशद्वारावरच सर त्यांच्या जुन्या रॅलो सायकलवरून खाली उतरायचे आणि पैदल येत सायकल पार्किंग झोनमध्येच ठेवायचे.
शिकवितांना सरांची खडूला फुंकर घालण्याची वेगळीच लकब असायची. वर्गात सर्व विद्यार्थ्यांवर सरांचे लक्ष असायचे, पोशाख फाटला असला तरी तो स्वच्छ असण्यावर त्यांच्या सूचना असायच्या, स्पष्ट शब्दोचारामुळे सरांचा प्रत्येक शब्द मोत्याप्रमाणे भासायचा. वक्तशीरपणाबद्दल तर उ.दा. सरांचे कित्येक जण अनेक ठिकाणी दाखले देतात. दिलेली वेळ पाळणं आणि आपल्यालाही त्याचे प्रांजळ स्मरण करून देणं हे अनेकांना ठाऊक असेल. सरांच्या निधनाची वार्ता कानावर पडली तेव्हा रात्र झाली होती. सकाळी नऊला अंत्ययात्रा घरून निघेल ही वेळही कळली होती. सकाळी नऊला सरांच्या घराकडे निघालो तेव्हा सरांची अंत्ययात्रा ठरल्या वेळेत सुरू झाली होती…विद्यार्थ्यांशी मायेनं संवाद साधणारा गुरू आपल्यातून निघून जात असल्याचा विचार अस्वस्थ करणारा होता. आजन्म नीतीमूल्याची जाणीव आपल्या जीवनीतून करून देणाऱ्या उ.दा. सरांचा वक्तशीरपणाचा पाठ अंतिम समयीही कडा ओलावून गेला…
अश्विन गुणवंतराव सवालाखे