जिल्हा प्रतिनीधी जीवन माळी नंदूरबार
कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत महिलेने शिक्षकाच्या घरी धाडसी घरफोडी करून सुमारे 3 लाखांची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील कोकणीहिल परिसरातील साईबाबा नगरात घडली. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी पितांबर चौधरी हे कुटूंबियांसह शहरातील कोकणीहिल परिसरातील साईबाबा नगरात वास्तव्यास असून ते बाहेरगावी गेले होते. याची सुवर्ण संधी साधत मोहिनी निलेश पाटील (वय 32) रा. गणेश नगर, जैन पेट्रोल पंप जवळ नंदुरबार हिने बंद घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडत आत प्रवेश करून लोखंडी कोठी व प्लायवुडच्या कपाटातुन 3 लाख 10 हजार रुपयांची रोकड व 8 हजार रुपये किंमतीचे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात एक सोन्याचे बिस्कीट व एक कॉईन चोरुन नेला आहे. शिक्षक शिवाजी पितांबर चौधरी बाहेरगावाहुन आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर ते चक्रावून गेले. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती कळविली. ही घटना दि. 11 ते 13 मे रोजीच्या दरम्यान घडली आहे. याबाबत शिवाजी पितांबर चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहिनी निलेश पाटील ( वय 32) रा. गणेश नगर, जैन पेट्रोल पंप जवळ नंदुरबार 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी काकटे करीत आहेत.