घनसावंगी -लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या सरहद्दीवर गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूकिचा गोरख धंदा फोफावला असून या बाबतीत महसुल आणि पोलिस प्रशासन अधिकारी मात्र निव्वळ ड्रामेबाजी करत आहेत.
घनसावंगी तालुक्यातील गुंज-काळेगावच्या नदी पात्रात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे .गोदावरी नदी पात्रातून माजलगाव तालुक्यात वाळू वाहतूक साठी नदीचेपात्र नियमबाह्यरित्या अडवले असून शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडविला जात आहे. माजलगाव च्या तहसिलदार वर्षा मनाले यांनी गोदावरी नदी पात्रात येवून जेसिबी मशिनद्वारे रस्ता उखडून कर्तव्यदक्ष असल्याचा आव आणला. दोन दिवस वाळू वाहतूक बंद पाडून तडजोडीनंतर ((?) रस्ता पुर्ववत करुन ओव्हरलोड वाळूवाहतूक सुरू झाली आहे.अधिकाऱ्यांच्या या ड्रामेबाजीमुळे गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू वाहतुक सुरू असून या मुळे वाळू माफियांचे मनोधैर्य वाढले आहे. गोदावरी पात्रात गुंज-काळेगाव गट नंबर ३६१-३६२ अंतर्गत सरहद्द ओलांडून वाळूचा उपसा सुरू आहे.सव्वा मिटरची मर्यादा असतांना ६-७ फुटापर्यंत खोदकाम करून वाळू उपसा होत आहे.गोदावरी पात्रातील धार कोंडून बीड आणि जालना जिल्ह्यात वाळू वाहतूक होत आहे यासाठी महसुल विभागाचे भरारी पथक नावापुरतेच असून संबंधित पोलिस ठाणेआणि पोलिस चौक्यासमोरूनवाळू वाहतूक होताना दिसते.मात्र महसूल आणि पोलिस प्रशासन ढुंकूनही बघत नाही.