सुशांत आगे – पुणे
नऊ महिन्यांपूर्वी तालुक्यातील बाभळगाव येथुन बेपत्ता असलेले निराधार समितीचे माजी सदस्य दिगांबर हरिभाऊ गाडेकर यांच्या खुनास अखेर वाचा फुटली असून त्यांच्या पत्नीच्या तीन प्रियकरांनी कट रचून पळवून नेऊन जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या रिधोरीच्या बंधाऱ्यावर खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी तिघाजनांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला. सप्टेंबर 2021 मध्ये दिंद्रुड पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी गाडेकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती, तेव्हापासून ते बेपत्ता होते. यातच दि. 11 मे बुधवार रोजी शेलगावथडी शिवारात असलेल्या बापूराव डोके यांच्या शेतात असलेल्या विहिरीत अज्ञात व्यक्तीचे कंबरेच्या वरील भाग नसलेले प्रेत आढळले. पोलिसांनी आजूबाजूच्या गावात याबाबत विचारणा केली असता जवळपासचे कोणीही हरवल्याची घटना घडलेली नव्हती. यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडथळे निर्माण होऊ लागले होते. अखेर मृतदेहावर असलेल्या पॅन्टच्या खिशात काही महिलांचे फोटो आढळून आले. त्या महिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हा मृतदेह दिगांबर गाडेकर यांचा असल्याचे सांगितले. दिगांबर गाडेकर हे निराधार महिलांना योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे यासाठीच या महिलांनी त्यांना छायाचित्र व आधारकार्ड दिले होते. त्यावरून मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी बाभळगाव येथील घरी पोलिस पथक पाठवले असता गाडेकर याची पत्नी देखील तेथे आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला व पत्नीस केंद्रित करून तपास सुरू केला असता मयत दिगंबर याचा पुतण्या गणेश नारायण गाडेकर, भाचा सोपान सोमनाथ मोरे (रा उक्कडगाव ता. घनसावंगी जि. जालना), बाळासाहेब जनार्धन घोंघाने (रा. मोगरा) या तिघांनी मयताच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर नेऊन रिधोरी बंधाऱ्याच्या ठिकाणी दिगंबर याचा कुऱ्हाडीने खून करून शरीराचे दोन तुकडे करून दोन पोत्यात बांधून शेलगाव थडी शिवारात डोके यांच्या विहिरीत टाकले होते. 11 मे रोजी प्रेत तरंगत वर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. गुरुवारी दि. 19 रोजी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, उपनिरीक्षक बोडखे, रवी राठोड, खराडे यांच्या पथकाने यशस्वी केली.
Home पश्चिम महाराष्ट्र धक्कादायक ! तीन प्रियकरांनी केले प्रेयसीच्या पतीचे दोन तुकडे, माजलगावातील खून प्रकरणाचा...