रावेर (शेख शरीफ)
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) महाराष्ट्र शिक्षकांच्या या राष्ट्रीय संघटनेचा चार दिवसीय *अज़्म-ए-नव* प्रशिक्षण शिबीर आज येथे संपन्न झाला. या शिबिरात अब्दुल रहीम शेख (राष्ट्रीय अध्यक्ष), अस्लम फेरोज़ (राष्ट्रीय सचिव), सय्यद शरीफ (राज्य अध्यक्ष ), मोहम्मद अतीक़ शेख (राज्य सचिव), रियाज़ुल ख़ालिक़ ( राज्य उपाध्यक्ष), प्रा. ज़ियाउर रहमान अंसारी (मुंबई), अब्दुल क़वी फलाही (औरंगाबाद) व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयटा महाराष्ट्राच्या सल्लागार व इतर समित्यांचे सदस्य व तसेच संबंध राज्यातून आलेले जिल्हा अध्यक्ष व सचिव यांना मान्यवरांनी संबोधित केलं.
अब्दुल रहीम शेख आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, *आयटा* देशातील शिक्षकांची एकमेव अशी संघटना आहे जे शिक्षकांना आपली जबाबदारी प्रभावीपणे शाश्वत पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते.
श्री शेख पुढे म्हणाले की,
“विद्यार्थ्यांचं भविष्यच घडवायचं नाही ; तर त्यांना भविष्यासाठी घडवायचं आहे.” या दृष्टिकोनातून शिक्षकांनी कर्तव्यनिष्ठतेने आणि प्रामाणिकपणे आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी.
सय्यद शरीफ उपस्थितांना आवाहन करत म्हणाले की, देशात शैक्षिक क्रांती घडवण्याचं आयटाचा स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना ऑल इंडियन ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन या संघटनेशी जोडण्यासाठी आत्मियतेने प्रयत्न करावेत.
अब्दुल क़वी फलाही यांनी क्रांतिकारी आदर्श शिक्षकांच्या इतिहासावर सविस्तर प्रकाश टाकला. व तसेच ज़ियाउर रहमान अंसारी यांनी शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केलं.
सय्यद सादतुल्लाह हुसैनी (अध्यक्ष जमाते इस्लामी हिन्द ) यांनी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून *अज़्म- ए- नव* या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित शिक्षकांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, शिक्षकांनी सतत आपलं आत्मपरीक्षण करावं . झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी आणि आपली शैक्षणिक, बौद्धिक व तांत्रिक क्षमता वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. ते पुढे म्हणाले की शिक्षकांनी अध्यापनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरतपणे प्रयत्न करत राहावे.
या शिबिरात सुरुवातीला मोहम्मद अतीक़ शेख यांनी प्रस्ताविक मांडलं तर रियाज़ुल ख़ालिक़ यांनी प्रस्तावित कार्यांचा आराखडा प्रस्तुत केला.
प्रशिक्षण शिबीर संपल्यानंतर सर्व शिक्षकांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली व तसेच महाबळेश्वर येथील विविध पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष जाऊन निसर्गरम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला.