मुलाचा अपघात झाल्याचे सांगून शेतकऱ्याला रिक्षात बसवून गुंगीचे औषध देऊन बीडला सोडले
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
घनसावंगी तालुक्यातील करडगाव येथील शेतकरी बाबुखान लालखान पठाण (वय 52) यांनी शेतीच्या खरेदीसाठी पै-पै करून सहा लाख रुपये जमविले होते.
ही रक्कम शेतीचा ज्यांच्यासोबत व्यवहार होणार होता, त्यांना बँकेमार्फत देण्यात येणार होती.
त्यामुळे बाबुखान पठाण आणि त्यांचा मुलगा सलमान हे दोघे 18 मे रोजी शहरातील भोकरदन नाका भागातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत 6 लाख रुपये जमा करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी बँकेत मध्यान्ह जेवणाची वेळ झाल्याने व्यवहार बंद असल्याने बाबुखान पठाण बँकेपासून काही अंतरावर असलेल्या पानटपरीवर तंबाखू आणण्यासाठी गेले होते.
तेवढ्यात त्यांच्याजवळ एक ऑटोरिक्षा येऊन थांबली, रिक्षातील एकाने सांगितले की, तुमच्यासोबत असलेल्या तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे, त्याला सरकारी दवाखान्यात नेले आहे, असे म्हणून रिक्षात बसविले.
मुलाच्या अपघाताची बातमी ऐकून बाबुखान पुर्णतः घाबरून जाऊन, घामाघूम झाले होते, त्यावेळी रिक्षात पाठीमागे बसलेल्या दोघांपैकी एकाने गुंगीचे औषधी लावलेल्या रुमालाने त्यांचा घाम पुसण्याचे नाटक केले.
त्यामुळे बाबुखान हे बेशुद्ध झाले असता, त्यांच्या खिशातील 6 लाख रुपये भामट्यांनी काढून घेऊन, त्यांना बीडजवळ नेऊन सोडले.
शुद्धीवर आल्यानंतर हा लुटमारीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाला फोन करून बीडला बोलावून घेतले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी 19 मे रोजी त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल करीत आहेत.