२१ व्या शतकात विज्ञान अध्यापन पद्धतींमध्ये आवश्यक असलेल्या कौशल्यांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी “महाराष्ट्र सायन्स फेअर अकादमी” द्वारा मुंबई येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले
रावेर ( शेख शरीफ)
आयटा महाराष्ट्राचे सायन्स फोरम “महाराष्ट्र सायन्स फेअर अकादमी” आणि अंजुमन-ए-इस्लाम सैफ तय्यब जी गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय *अल-हैसम विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा* यशस्वीरित्या संपन्न झाली.
कार्यशाळेला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा.डॉ. क़ाज़ी सिराज अज़हर (मिशिगन युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक) आणि चेन्नई येथील डॉ.एम.एम.अब्दुल कमाल नज़ीर (शैक्षणिक समन्वयक आणि कार्यकारी मंडळ सदस्य OMEAT) उपस्थित होते. तेलंगणा सायन्स फेअर अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अज़ीज़-उर-रहमान आणि सचिव ग़फूरून्निसा व तसेच आयटा महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष सय्यद शरीफ, सचिव मुहम्मद अतीक़ शेख व इतर उपस्थित होते.
या वेळी विज्ञान प्रकल्पांची प्रायोगिक रूपरेषा आणि विज्ञानाच्या आधुनिक अध्यापन पद्धती व शिक्षकांमधील वैज्ञानिक संशोधन वृत्ती स्पष्ट करण्यासाठी, पुरस्कार विजेत्या प्रकल्पांचे स्पष्टीकरण, सायन्स फेअर अकादमी कशा पद्धतीने कार्य करते व त्याची उपलब्धी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. क़ाज़ी सिराज अज़हर यांनी आपल्या व्याख्यानात बालकाची कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी त्याला त्याच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणे आवश्यक आहे हे उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. मातृभाषेचे फायदे सांगताना ते म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षण सोडत नाहीत. सायन्स फेअर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शोध घेण्याची क्षमता कशी जागृत होते, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनाऐवजी विज्ञान मेळावे आयोजित केल्यास भविष्यात निश्चितच आपले विद्यार्थी वैज्ञानिक बनून देशाची सेवा करतील.
सदरील प्रशिक्षणाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध इस्लामिक विद्वान, भाष्यकार आणि लेखक डॉ. सलीम खान हे होते. ते म्हणाले की, आपण फक्त मध्ययुगीन शास्त्रज्ञांच्या कामगिरीवरच प्रकाश टाकून चालणार नाही ; तर सध्याच्या दशकातील शास्त्रज्ञांचेही यश नवीन पिढीसमोर मांडले पाहिजे.
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ.ज़हीर क़ाज़ी हे होते. अंजुमनच्या ऐतिहासिक शैक्षणिक सेवेचा उल्लेख करत ते म्हणाले की,
प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात सहकार्य करणं हे अंजुमन- ए-इस्लामची परंपरा आहे. म्हणून भविष्यात अशा प्रकारच्या सर्व उपक्रमांना आयटाला सहकार्य करण्यास अंजुमन सदैव तत्पर राहिन.
ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती रुजवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) महाराष्ट्राचे अध्यक्ष सय्यद शरीफ संबोधित करताना म्हणाले की, आयटा महाराष्ट्र शिक्षकांसाठी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. सर्व शिक्षकांनी याचा आवश्य लाभ घ्यावा. व तसेच या प्रशिक्षण शिबिरात अर्जित केलेले ज्ञान इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवावे जेणेकरुन राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे परिणाम साध्य करण्यासाठी आयटा महाराष्ट्र लवकरच कृती आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करेल. शिक्षकांनी आपली जबाबदारी समजून विद्यार्थ्यांना विज्ञान मेळाव्यासाठी तयार करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
हे लक्षात घेतले पाहिजे की विज्ञान मेळावा हे विद्यार्थ्यांमधील एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे संशोधन आणि शोध सादर करतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील क्षमता विकसित होते.
महाराष्ट्र सायन्स फेअर अकादमचा उद्देश विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती विकसित करणे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची शोधाच्या क्षमतेसह सर्जनशील बुद्धिमत्ता विकसित होईल.
दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील जवळपास 8 जिल्ह्यांमधून निवडक 150 शिक्षक सहभागी झाले होते. सर्व सहभागींची दोन दिवसांच्या राहण्याची आणि जेवणाची यथोचित व्यवस्था करण्यात आली होती. श्रीमती शमा तारापूरवाला, (प्राचार्या: अंजुमन-ए-इस्लाम सैफ तय्यब जी गर्ल्स हायस्कूल) यांनी आपल्या संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसह, या प्रयत्नात खूप सहकार्य केले.
आयटा महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायन्स फेअर अकादमीचे कन्विनर अन्सारी तन्वीर आणि इतर सदस्यांनी अल-हैसम विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.