(पशुकल्याण संस्थांचा पुढाकार)
(निःशुल्क सेवेतून जपले प्राणीहीत)
यवतमाळ (प्रतिनिधी) : कुठलेही अनुदान अथवा शुल्क न घेता पशुकल्याण संघटनांचे सहकार्य, रुख्मिणी पांडुरंग संस्थाचे दातृत्व तसेच नगर परिषदेच्या पुढाकाराने शासकीय पशुवैद्यकांनी दिलेल्या सेवेतून यवतमाळात पहिल्यांदाच लोकसहभागातून मोकाट श्वान निर्बीजीकरण शिबीर यशस्वी झाले.
बुधवारी गोधनी रोडवरील गोरक्षण येथे या सेवा शस्त्रक्रिया सुरक्षित पार पडल्या.
शहर आणि परिसरातील मोकाट कुत्रांचा बंदोबस्त होण्यासाठी पशु (श्वान) जन्मदर नियंत्रण मिळविण्यासाठी मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण व्हावे अशी नागरिकांची मोठी मागणी होती. याअंतर्गत नगर परिषदेत 23 मे ला यवतमाळातील पशुकल्याण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे शहरातील मोकाट श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठीचे शिबीर घेण्याचे ठरले. तद्नुसार नगर परिषद अंतर्गत पशु (श्वान) जन्मदर सनियंत्रण समिती स्थापन झाली.
मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांच्या पदसिद्ध अध्यक्षतेत संबंधित क्षेत्रातील मान्यवरांच्या समितीच्या देखरेखीत हा धर्मार्थ उपक्रम प्रायोगिक स्तरावर राबविण्यात आला.
केंद्रीय पशुकल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व दिशानिर्देशानुसार पशु (श्वान) जन्मदर सनियंत्रण समितीच्या देखरेखीत हे शिबीर पार पडले. यावेळी समिती सदस्य तथा संस्थांनचे अध्यक्ष डॉ दिनकर बडे, उपाध्यक्षा विद्याताई खरे, डॉ राजेंद्र अलोणे, डॉ भीमसिंग चव्हाण, अश्विन सवालाखे, डॉ विजय अग्रवाल, दत्ताभाऊ कुळकर्णी, अमोघ व्होरा, अपूर्वा शर्मा, दिनेश तिवाडे, शताक्षी कांबळे, कुणाल सिडाम, राहुल दाभाडकर, प्रतीक तराळकर, निलेश मेश्राम, अभिजित गुल्हाने यांच्यासह बी काइंड, लिटिल पॉज, एक हात मदतीचा या पशुकल्याण संघटनांचे पशुस्नेही उपक्रमासाठी सक्रिय होते.
चौकट
श्वानप्रेमी संस्थानचे दातृत्व – या शिबिरासाठी रुख्मिणी पांडुरंग संस्थानामार्फत श्वानांच्या उपचारार्थचा पूर्ण खर्च देण्यात येत आहे. संस्थानाच्या गोधनी रोडवरील गोरक्षण येथे अद्यावत बांधकाम असलेले शल्यक्रियागार आणि श्वानांसाठी 5 मोठ्या हवेशीर पिंजऱ्याची व्यवस्था संस्थानानेच केली आहे. औषधोपचाराचा पूर्ण खर्चही संस्थानच देत आहे.
चौकट
कुत्रा पळाला, उदघाटन रद्द – बुधवारी निर्बीजीकरण ठरल्याने मंगळवारी सायंकाळपासून श्वानांना गौरक्षणातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रिया बिनधोक होण्यासाठी श्वान रात्रभर उपाशी असावेत हा उद्देश. सर्व सुरक्षा, सुविधा असूनही एक कुत्रा रात्रीतून पळाला. त्यामुळे त्याचे परिसरातील केअर टेकरने सकाळी भावुक होऊन दुःख व्यक्त केले. त्यामुळे समितीनेही नैतिकता पाळत व्यतिथ होऊन उदघाटन सत्र रद्द करीत आदर्श व सौजन्यतेचे उदाहरण दिले. पशुकल्याण संघटनांनी शोध मोहीम राबविल्यावर गोधनीच्या टेकडीवर कुत्रा मिळाला तेव्हा अन्य शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या.
चौकट
मोठ्या शिबिराचे आयोज – नप्रायोगिक स्तरावरील शिबीर यशस्वी झाल्यानंतर समितीमार्फत सर्वचिकित्सालयात या शस्त्रक्रिया होणार असून पावसाळा आटोपल्यावर मोकाट श्वान निर्बिजीकरणाचे मोठे शिबीर घेण्यात येणार आहे.