बुलढाणा .
जडणघडणीच्या काळात आठराविश्वे दारिद्र्यात माझ्या वाचनाची वाळवंटव्यापी तहान रद्दीने विझवली , रद्दीतूनच माझ्या भाषेची शिल्प आकारले साकारले, भाषेवर कलावंताला जगता येते हे माझ्या शब्दायात्रेने सिद्ध केले. माणसाच्या सुख समृद्धीचे रस्ते पुस्तकातून जात असतात असे चिंतनीय प्रतिपादन प्रख्यात मराठी कवी नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांनी केले
पाच जुलै 2022 रोजी लाखणवाडा येथील अध्यापनाच्या क्षेत्रात जिल्ह्यात आपले वेगळेपण जोपासणाऱ्या लष्करीया नूरबानो हायस्कूल अँड मोहम्मद शरीफ ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते ,
समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात उर्दू शायर मुस्तफा जमील बालापूरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धहस्त पत्रकार गनी गाजी, सचिव मोहम्मद जिशान प्रामुख्याने उपस्थित होते ,
समारंभा अध्यक्ष तथा प्रमुख अतिथीचा परिचय शिक्षक नईम खान यांनी करून दिला, आपल्या मनोगतात अजीम नवाज राही पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाची मुळे शिक्षणाच्या अभावाच्या जमिनीत खोलवर रुसलेली आहेत, जोवर आम्ही शिक्षणाची कास घट्ट धरत नाही तोवर दारिद्र्याचा, मागासलेपणाचा हा दाट काळोख सरणार नाही, सर सैय्यद अहमद खान यांनी शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाजात जागृती करण्याचा आटोकाट प्रयत्न आयुष्यभर केला, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यांच्या त्या डोळस आव्हानाला समाजात म्हणावे त्या पातळीवर गांभीर्याने घेतले गेले नाही, मनोगतादरम्यान अजीम नवाज राही यांनी व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत ,वर्तमानाचा वतनदार ते तळमळीचा तळ या चार कवितासंग्रहापर्यंतचा आपला संघर्षशील प्रवास श्रवणीय शैलीत कथन केला, माझ्या चिल्या पिल्यांचा पात्रात पडणारी भाकर ही शब्दांची कमाई आहे, मायमराठी रोज माझ्या प्रपंचाचा दिमतीला येते, भाषेवर वक्तृत्वावर, निवेदनावर जगता येते, साधनेतून कलावंत सधन होतो, एखाद्या ओघवत्या कवितेसारखे अजीम नवाज राही यांचं मनोगत वाक्यागणिक टाळ्या मिळवणारे ठरले, कार्यक्रमाचे संचालन समी सौदागर यांनी तर आभार प्रदर्शन गुलाम जफर यांनी केले, कार्यक्रमाला लाखनवाडाकर मराठी,उर्दू साहित्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला,