Home यवतमाळ नागपूर मेट्रो’ व ‘समृद्धी’ महामार्गाचा यवतमाळपर्यंत विस्तार करा – आमदार संजय राठोड...

नागपूर मेट्रो’ व ‘समृद्धी’ महामार्गाचा यवतमाळपर्यंत विस्तार करा – आमदार संजय राठोड यांची ना. गडकरी, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती…

1230

 

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातून गेलेल्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा भागात दळणवळण क्रांती झाली. आता ‘नागपूर मेट्रो’ आणि ‘समृद्धी’ महामार्गाचा यवतमाळपर्यंत विस्तार करून या आदिवासी व बंजाराबहुल जिल्ह्यात उद्योग व रोजगार संधी निर्माण कराव्या, अशी मागणी आमदार संजय राठोड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार संजय राठोड यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यवतमाळच्या विकासात भर घालण्यासाठी नवीन सरकारने मेट्रो व समृद्धी महामार्गाचा यवतमाळपर्यंत विस्तार करून जिल्हावासीयांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची विशेष भेट द्यावी, अशी विनंती आ. संजय राठोड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहून आ. संजय राठोड यांनी मेट्रो, समृद्धीच्या कनेक्टीव्हीटीसह जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गांचा कॅरिडॉर तयार करून त्यांना राष्ट्रीय महामार्गांत दर्जोन्नत करण्याची विनंती केली.
यवतमाळ व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर नेर येथून अंदाजे १६ किमी अंतरावर शिवणी गावाजवळ समृद्धी महामार्गाचे आगमण व निर्गमण मार्ग देण्यात आलेले आहे. नेरमार्गे यवतमाळपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात करण्यात यावा, अशी विनंती ना. गडकरी यांच्याकडे आ. राठोड यांनी केली आहे. तसेच दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथील श्री मुंगसाजी माऊली दरबार, दिग्रसनजीक असलेले बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी, कळंब येथील चिंतामणी देवस्थान, आर्णी येथील बाबा कंबलपोश दर्गाह, केळापूरचे जगदंबा देवस्थान, वणी येथील जगन्नाथ महाराज व जैताई देवस्थान ही तीर्थक्षेत्रे या महामार्गाने जोडली गेल्यास जिल्ह्यात धार्मिक पर्यटनास वाव मिळून, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे आ. संजय राठोड यांनी पत्रात म्हटले आहे. यासोबतच दारव्हा तालुक्यातील सांगवी ते नेर तालुक्यातील सातेफळ- मोझर- नेर- मांगलादेवी- पहूर- बाभुळगाव- कळंब हा राज्यमार्ग (क्रमांक ३१७) राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नत करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. या मार्गाचा विकास झाला तर परिसरातील शेतकऱ्यांनाही सोईचे होईल, असे आ. राठोड यांनी म्हटले आहे.
नागपूर मेट्रोचा यवतमाळपर्यंत विस्तार करण्याची विनंतीही आ. राठोड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मार्गासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग विकसित करून यवतमाळपर्यंत मेट्रोचा विस्तार केल्यास यवतमाळ-वर्धा-बुटीबोरी-नागपूरचा प्रवास कमी वेळेत पूर्ण होऊन शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यासह अनेकांना रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील, असे आ. राठोड यांनी म्हटले आहे. या विनंतीचा ना. गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच विचार करून यवतमाळ जिल्ह्यातील जनतेच्या सोईसाठी सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आ. संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे.