Home मराठवाडा भर पावसात महिलेची रस्त्यावरच प्रसूती,डॉक्टराच्या विरोधात नातेवाईक संतप्त,कारवाई करण्याचा इशारा

भर पावसात महिलेची रस्त्यावरच प्रसूती,डॉक्टराच्या विरोधात नातेवाईक संतप्त,कारवाई करण्याचा इशारा

339

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

देशात एकीकडे वेगाने विकास होत असताना दुसरीकडे छोट्या छोट्या गावांमध्ये मात्र आजही नागरिकांना सुविधांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात.अशीच एक घटना सध्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने भर पावसात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच रस्त्यावर महिला प्रसूती झाल्याची घटना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ३० जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता घडली.हा प्रकार आरोग्य विभागासाठी अतिशय निंदनीय स्वरूपाचा असून नातेवाईक,ग्रामस्थांनी या घटनेबाबत रोष व्यक्त केला.

वडीगोद्री येथील रुपाली राहुल हारे या महिलेला प्रसूती कळांचा त्रास होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्षात घेऊन आले.तेव्हा नातेवाईकांनी दवाखान्यात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व महिला आरोग्य सेविका उपस्थित नव्हती.तेव्हा खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर येताच रस्त्यावरच भर पावसात त्या महिलेची प्रसूती झाली.त्यानंतर डॉक्टर व कर्मचारी यांना फोन केला.

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रात्री येणाऱ्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचा उपचार मिळत नाही.या रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक वेळा रुग्ण हे गंभीर झाले आहेत.आरोग्य कर्मचारी हे स्थानिक राहत नाही.नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचारी यांना संपर्क करूनही एक तास कोणीही आले नाही.

असं म्हटलं जातं की,प्रसूती म्हणजे महिलेचा दुसरा जन्म असतो.ही वेळ गरोदर महिलेसाठी अत्यंत कठीण आणि तेवढीच घातकही ठरू शकते.त्यामुळे प्रसूती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी होणं अत्यंत गरजेचं आहे.मात्र,हा अतिशय अजब प्रकार घडला.इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारीच नसल्याने नामुष्की ओढावली.

त्यामुळे तासभर गरोदर माता,बाळ व नातेवाईक हे भर पावसात उभे होते.त्यानंतर खाजगी महिला डॉक्टर व परिचारिका यांनी येऊन गरोदर मातेची नाळ कापली.त्यानंतर गरोदर माता व चिमूकल्या बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असून माता व नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.ही घटना समाजाचं अतिशय भयंकर वास्तव दाखवणारी आहे.भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाच अजूनही अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांची वाणवा असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे.

प्रतिक्रिया

१) डॉक्टर व कर्मचारी नसल्याने माझ्या पत्नीची प्रसूती रस्त्यावर झाली आहे.हा गंभीर प्रकार असून ड्युटीच्या वेळेत ड्युटीवर नसलेल्या डॉक्टर व कर्मचारी यांना निलंबित करा,नसता दवाखान्याला कुलूप ठोकण्यात येणार आहे….राहुल हारे,महिलेचा पती, वडीगोद्री

२) वडीगोद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेसंदर्भात चौकशी समिती नेमली आहे.ही चौकशी समिती सदरील घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करेल.या अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल…डॉ.विवेक खतगावकर,जिल्हा आरोग्य अधिकारी,जालना