(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी, 7 ऑगस्ट – घाटंजी पोलीस स्टेशनच्या वतीने घाटंजी पोलीस ठाणे, पारवा पोलीस ठाणे व वडगांव जंगल पोलीस ठाणे मिळुन जलाराम मंदीर येथे शांतता समितीची सभा संपन्न झाली. या वेळी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर, घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर, घाटंजीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रंजित जाधव, घाटंजी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार दिलीप राठोड, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, वडगांव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड आदीं मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांनी केले. ते या वेळी म्हणाले की, घाटंजी तालुक्याची पार्श्वभूमी विषद करुन घाटंजी तालुका व शहर शांतपूर्ण असा तालुका असल्याचे सांगून घाटंजी तालुक्याची सविस्तर माहिती दिली. तसेच सण, उत्सव व ईतर धार्मिक सण शांततेत पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचे सोबतच पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, पुढील तीन महिने होणारे सण, उत्सव, रक्षाबंधन व शेतकऱ्यांचा पोळा सण, गणेशोत्सव व त्यात सतत पडणारा पाऊस यात सर्व सण शांतपणे साजरे करावे. तसेच त्यात मागील दोन वर्षे कोरोना मुळे सण, उत्सव साजरा करण्यासाठी कडक निर्बंध होते. त्यामुळे या वेळी मात्र आनंदमय वातावरण व कोरोनाच्या नियमांचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्यात यावे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळाने धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करुनच वर्गणी वगैरे नियमानुसार गोळा करणे आवश्यक असल्याचे म्हटले. ज्यामुळे देणगी देणारे व मंडळाच्या सदस्यांमध्ये कोणताही वाद – विवाद होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच गणेशोत्सवाच्या काळात पोलीस विभागाकडुन नियमानुसार परवानगी काढूनच ध्वनीक्षेपक वाजविणयात यावे. विशेष म्हणजे डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन धरणे यांनी या वेळी केले. मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावे ज्यामुळे महिलांचा सहभाग वाढेल व संस्कृतीची जोपासना सुद्धा होईल, असेही ते यावेळी म्हणाले. धार्मिक उत्सवात समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात यावे. सर्व सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे अशा अन्य सूचना यावेळी त्यांनी केल्या.
घाटंजी येथील न्यायालयाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्य समाजातील वंचित घटकाला मोफत सल्ला व मार्गदर्शन केले जातात. विधी सेवा समितीचे कार्य पोलीस, न्याय व्यवस्थेवर ताण कमी करणे हाच एकमेव उद्देश असुन न्यायालयीन खटले कमी करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये न्याय व व्यवस्था शांततापूर्ण ठेवावे व लोक अदालतीत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपले प्रकरण निकाली काढावे, असे आवाहन उत्पात यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन राजेश उदार – सर यांनी केले. तर आभार पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी मानले. घाटंजी पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीला घाटंजी तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेसह घाटंजी पोलीस स्टेशन, पारवा पोलीस स्टेशन, वडगाव जंगल पोलीस स्टेशन पोलीस स्टाॅफ तसेच पोलीस पाटील, तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम,
गोपनीय विभागाचे पोलीस शिपाई वामन जाधव, वाहतूक पोलीस शिपाई शेख कलीम शेख कय्युम, घाटंजी पोलीस विभागातील सर्व कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.