Home महत्वाची बातमी रामदास स्वामी मंदिरातील मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचा बक्षीस ,

रामदास स्वामी मंदिरातील मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचा बक्षीस ,

802

 

विधानसभेत ही उमटले पडसाद ,

अमीन शाह

जालन्यातील रामदास स्वामी यांच्या मंदिरातील प्राचीन मूर्ती चोरणाऱ्यांना पकडून देणाऱ्याला 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. जालना पोलिसांच्या वतीने हे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जांब समर्थ हे रामदास स्वामी यांचे जन्मगाव असून ते ज्या मूर्तींची पूजा करत असत, त्याच राम-सीतेच्या मूर्तींची चोरी रविवारी रात्री झाली. तेव्हापासून रामदास स्वामींच्या भक्तांमध्ये तसेच जांब समर्थ गावात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. आमचा देव परत आणून द्या, नाही तर संपूर्ण गाव अन्नत्याग करेल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. जालना पोलीसदेखील चोरट्यांना पकडण्यासाठी दिवसंरात्र तपास करत आहेत. मात्र दोन दिवस झाले असूनही चोरांचा काहीही मागमूस लागलेला नाही. त्यामुळे चोरांची माहिती देणाऱ्याला प्रोत्साहनपर पारितोषिक दिलं जाईल, असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय.

रामदास स्वामींच्या वंशजांची भेट

दरम्यान, रामदास स्वामी यांचे 11 वे वंशज भूषण स्वामी यांनी जांब येथे भेट दिली. सोमवारी रात्री ते गावात दाखल झाले. गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी पोलिसांच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समर्थांच्या देवघरात झालेली चोरी ही निषेधार्ह बाब आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची दखल घेतली असली तरी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या मूर्ती शोधून काढाव्या अशी मागणी भूषण स्वामी यांनी व्यक्त केली आहे.

गावकऱ्यांचा इशारा काय?

रामदास स्वामी यांच्या मंदिरातील मूर्ती चोरीला दीड दिवस उलटत असून अद्याप चोरट्यांचा शोध लागला नसल्याने जांब येथील गावकरी प्रचंड नाराज आहेत. राम-सीतेची मूर्ती जेथून चोरीला गेली, तेथे सध्या पुजाऱ्यांनी प्रतिकात्मक दुसरा एक फोटो ठेवला आहे. सध्या त्याचीच पूजा केली जातेय. पूजा-आरतीच्या वेळी गावकरी नेहमीप्रमाणे मंदिरात जमत आहेत, मात्र गाभाऱ्यात देव नसल्यामुळे ते कासावीस होत आहेत. आमचा देव आम्हाला परत आणून द्या, नाही तर उद्यापासून अन्नत्याग आंदोलन करू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

कोणत्या मूर्तींची चोरी?

रामदास स्वामी यांच्या प्राचीन निवासस्थानातील राम मंदिरातील 450 वर्षांपूर्वीच्या मूर्तींची चोरी रविवारी मध्यरात्रीतून झाली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरीची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जांब समर्थ येथील या मंदिरातील राम-लक्ष्मण-सीतेची पंचधातूंची मूर्ती चोरीला गेली. तसेच राम-लक्ष्मण-सीता-भरत-शत्रुघ्न यांचे पंचायतनदेखील चोरीला गेले आहे. यासोबतच रामदास स्वामी जी मारुतीची मूर्ती झोळीत घेऊन प्रवास करत असत, ती मूर्तीदेखील चोरट्यांनी पळवली आहे. महाराष्ट्रभरातून हजारो भाविक रामदास स्वामींच्या या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र मुख्य मूर्तीच चोरीला गेल्यामुळे भाविकांमध्ये अस्वस्थता आहे. जालन्याचे आमदार राजेश टोपे यांनी काल विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी वेगाने चौकशीचे आदेश दिले होते.