यवतमाळ – राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून, गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे, असे प्रतिपादन अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी येथे केले.
आझाद मैदानात आयोजित पोळा सणात उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना ते आज शुक्रवारी बोलत होते.
पुढे बोलताना संजय राठोड म्हणाले, यवतमाळच्या आझाद मैदानात १९३५ पासून पोळा भरविला जात आहे. पोळ्याची ही प्रथा सुरू करून जिल्ह्यात एक समृद्ध संस्कृतीची परंपरा यवतमाळ नगर परिषदेचे त्या काळातील अध्यक्ष काकासाहेब पंडित, उपाध्यक्ष ब्रिजमोहन मोर व ऍड. श्रीखंडे यांनी सुरू केली. आजही याठिकाणी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील बैलजोड्या पोळ्यात सहभागी होतात व प्रत्येक वर्षी एक नवी दिशा देतात. शेती-माती आणि माणसांची नातीगोती घट्ट करणारा हा सण आहे. आज राज्यात शेतकरी पुत्रांचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः, आपण शेतकरी कुटुंबातील असून आम्हाला शेतकऱ्यांच्या संघर्षाची जाणीव आहे. त्यामुळे सरकार स्थापन होताच शेतकरी हिताच्या बळीराजा चेतना अभियान, जलयुक्त शिवार योजना, अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले, असे राठोड यांनी सांगितले. यावर्षी राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. यात ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. हवामानाचा अंदाज यावा यासाठी आता महसूल मंडळासोबतच मोठ्या गावांमध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. असे १० हजार स्वयंचलित केंद्र उभे राहणार आहेत. यापुढे पीक नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालय, कृषी कार्यालय व बँकेतही तक्रार, सूचना अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे, असे राठोड यांनी यावेळी सांगितले. सोबतच नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप केले जाईल, असे त्यांनी सांगितले. नुकसानभरपाईसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून ती तीन हेक्टर करण्यात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रसंगात खचून जाऊ नये, राज्य सरकार कायम आपल्यासोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. वर्षभर ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता शेतकरी, शेतमजूर आणि सर्जा-राजा बैलजोडी जगाच्या कल्याणासाठी राबत असतात. त्याची कृतज्ञ जाणीव समाजाला आहे. संकटांना घाबरून रडण्यापेक्षा आपण हातात हात घालून या संकटांविरूध्द लढू या! असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकरी बांधवांच्या अडीअडचणीत, सुख-दु:खात सरकार व आपण कायम सोबत आहो, कधीही हक्काने आवाज द्या, क्षणात हजर होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.