Home यवतमाळ डॉ. निरज वाघमारे आयोजित तान्हा पोळा स्पर्धेला बालकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

डॉ. निरज वाघमारे आयोजित तान्हा पोळा स्पर्धेला बालकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

1596

३८५ बालकांचा सहभाग, ओवी राऊत प्रथम तर हर्षित शिरसाठ यांनी पटकावला व्दितीय क्रमांक 


यवतमाळ / हरिश कामारकर
बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरे होणाऱ्या तान्हा पोळ्याला विदर्भात मोठी परंपरा आहे. विदर्भातील नागपूर शहरा नंतर चंद्रपूर आणि यवतमाळ मद्ये ही तान्हा पोळ्याचे मोठया प्रमाणात आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने आज यवतमाळतील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शहरातील शेकडो बालकांनी सहभाग नोंदविला होता.
विदर्भभर बैल पोळ्याच्या पाडव्याला ‘तान्हा पोळा’ साजरा केला जातो. बालगोपाल छोट्या लाकडी नंदीसह यात सहभागी होतात.
शेतकऱ्यांच्या, कृषी जीवनातील अविभाज्य भाग असणाऱ्या बैलाची महती अनन्यसाधारण अशी आहे. बैल एक पशु असला तरी शेतीकामात उपयुक्त ठरल्याने तो मानवासाठी पूजनीय ठरला आहे. म्हणूनच त्याला सजवून, मढवून पूजा करण्याचा दिवस म्हणजे पोळ्याचा सण. आज बळीराजाची अवस्था बिकट असली, आणि आजच्या आधुनिक काळातील तंत्रज्ञानाने बैलाचे महत्त्व कमी होत चालले असले, तरी ‘बैल पोळा’ मनोभावे साजरा होतो. तशाच मनोभावनेतून बैल पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात ‘तान्हा पोळा’ साजरा होतो.
मोठ्या बैलांच्या पोळ्यात लहानांना विशेष वाव नसतो. त्यामुळे बालगोपालांची हौस भागावी म्हणून दुसऱ्या रघुजींनी नागपुरात हा उत्सव सुरू केल्याचे सांगितले जाते. अल्पावधीतच हा सण विदर्भातल्या गावखेड्यात मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. यानिमित्त बालकांच्या मनात नकळत कृषिसंकृती आणि बैलांविषयीची जाणीव रुजण्यास मदतही होते. विदर्भाची ही संस्कृती आणि परंपरा चिरकाल टिकावी याकरिता या उद्देशाने डॉ. निरज वाघमारे यांनी दारव्हा रोडवरील नेताजी नगर भागात आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर शहरातील सर्व बालकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शहरातील ३८५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवून विविध कलाकृतीत माती पासून व लाकडापासून बनवलेल्या बैलांचा सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील लक्ष्मण पाटील, शिवदास कांबळे, कुंदन नगराळे, धम्मवती वासनिक,पुष्पा शिरसाट, विवेक वाघमारे, सुनिल पाटिल तर या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठीं यवतमाळ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मूर्तिकार राम चव्हाण व अमित राऊत सर यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३३३३/- द्वितीय २२२२/- तृतीय ११११ /- तर सर्व सहभागी स्पर्धकांना १११/- प्रोहत्सान पर बक्षिस ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत कु. ओवी व कु. सई राऊत ह्या बहिणींनी प्रथम पारितोषिक तर हर्षित क्षीरसागर या चिमुकल्याने द्वितीय पारितोषिक आणि आर्यन उफाडे या बालकाने तिसरे पारितोषिक प्राप्त केले. सकाळी दहा वाजता पाहुण्यांच्या उपस्थितीत बैलांचे पूजन करून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती तर बक्षीस वितरणाने स्पर्धेची सांगता झाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालकांचे यावेळी स्वागत करून पोळ्याच्या शुभेच्छा देत सहभागी झाल्याबद्दल आयोजक डॉ. निरज वाघमारे यांनी सर्व बालकांचे आभार मानले…