Home यवतमाळ डॉ. अनिल पटेल यांनी नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण केला – जिल्हाधिकारी अमोल...

डॉ. अनिल पटेल यांनी नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण केला – जिल्हाधिकारी अमोल येडगे

206

लोकवर्गणीतून  फिरत्या ‘इएनटी ऑन व्हिल्’ वाहनाचे लोकार्पणलोकवर्गणीतून मिळालेल्या फिरत्या ‘इएनटी ऑन व्हिल्स’ वाहनाचे लोकार्पण

यवतमाळ – आज वैद्यकीय क्षेत्राचे झपाट्याने व्यवसायिकरण होत आहे. अशा काळात सामाजिक हेतूने प्रेरित होऊन ग्रामीण भागात गेली ४२ वर्षे कान, नाक, घसा तपासणी व उपचार शिबिरांतून नि:शुल्क रूग्णसेवा करणारे येथील डॉ. अनिल पटेल यांनी नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथे केले.
स्थानिक बचत भवनात डॉ. अनिल पटेल यांना त्यांच्या चाहत्यांनी लोकवर्गणी करून भेट दिलेल्या ‘इएनटी ऑन व्हिल्स’ या विशेष वैद्यकीय वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय रत्नपारखी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, माजी नगराध्यक्षा कांचन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते किशोर मोघे, सुरेश राठी व सत्कारमूर्ती डॉ. अनिल पटेल, सौ. पटेल व डॉ. गौरव पटेल आदी उपस्थित होते.
येथील कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अनिल पटेल हे गेली ४२ वर्षे राज्यातील कानाकोपऱ्यात वैद्यकीय शिबिर भरवून मोफत सेवा देत आहेत, ही बाब उशिरा कळली, याची खंत आहे, मात्र त्यांचे कार्य इतरांना प्रेरणा देणारे आहे, असे जिल्हाधिकारी येडगे यावेळी म्हणाले. या सेवेदरम्यान जुळलेल्या रुग्णांसह मित्रांनी पै-पै जमा करून डॉ. पटेल यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अधिक वेगाने आणि अत्याधुनिक उपकरणांसह वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी ‘इएनटी ऑन व्हिल्स’ हे वाहन भेट दिले, ही विशेष गौरवाची बाब आहे. डॉ. अनिल पटेल यांनी आपल्या सेवेतून वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. तोच वारसा त्यांचे सुपूत्र डॉ. गौरव पटेल चालवित आहे, ही नक्कीच दखल घेण्यासारखी गोष्ट आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १५ लाख रूग्णांना नि:शुल्क आरोग्य सेवा पुरविणे हे समर्पण व त्याग भावनेचे दुर्मीळ उदाहरण ऋषीतुल्य डॉ. अनिल पटेल यांच्यामुळे बघायला मिळाले, असे गौरवोद्गार यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी काढले. जिल्ह्यात आरोग्य सेवेत सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र सर्व सुविधा असुनही विशेष डॉक्टर्स येथे सेवा देण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने चांगले प्रकल्प रखडतात, अशी खंत जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ यांनी डॉ. पटेल पिता-पुत्राच्या या सामाजिक जाणीवेमुळे दुर्लक्षित अशा कान, नाक, घसा या आजारांबद्दल ग्रामीण भागात जागृती निर्माण आहे, असे सांगितले. या कार्यामुळे लोकांच्या वेदना कमी करण्याचे महत्वाचे काम होत असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी डॉ. अनिल पटेल व डॉ. गौरव पटेल यांचा शाल, श्रीफळ देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लोकवर्गणीतून भेट दिलेल्या अद्ययावत वाहनाच्या चाब्या डॉ. पटेल यांच्या सुपूर्द करण्यात आल्या. सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिल पाटील म्हणाले, गेल्या ४२ वर्षांपासून आपण स्वत:च्या आनंदासाठी यवतमाळ जिल्ह्यासह मेळघाट, गडचिरोली, नंदुरबार अशा आदिवासीबहुल भागात व विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले वैद्यकीय गुरू डॉ पी.ए. शहा यांच्या स्मरणार्थ नि:शुल्क कान, नाक, घसा तपासणी शिबिर आयोजित करीत आहे. नुकतेच २८५ वे शिबिर केले. या शिबिरांमध्ये आलेल्या रूग्णांसह मित्र, परिवार आदींच्या आर्थिक योगदानातून ‘स्व. सी. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्ट’ला हे अद्ययावत वाहन मिळाले. त्यासाठी रूग्ण व समाजाचा कायम ऋणी राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शिबिराच्या ठिकाणी जागेची उपलब्धता, साहित्याची ने-आण यात बराच वेळ खर्च होत असल्याने, वैद्यकीय सेवेची ही बस उपयुक्त ठरणार आहे. वाहन उभे केले की, तपासणी सुरू करता येणार असल्याने रुग्णसंख्या वाढविता येणार आहे, असे डॉ. अनिल पटेल म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी केले तर आभार नितीन पखाले यांनी मान ले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.