Home विदर्भ आंध्रप्रदेशातून पांढरकवडा – यवतमाळ- बाभुळगावमार्गे गांजाची तस्‍करी ; चांदूर रेल्‍वेनजीक ४३५ किलो...

आंध्रप्रदेशातून पांढरकवडा – यवतमाळ- बाभुळगावमार्गे गांजाची तस्‍करी ; चांदूर रेल्‍वेनजीक ४३५ किलो गांजा जप्‍त.

254

 

मनिष गुडधे – अमरावती

यवतमाळ ते चांदूर रेल्‍वे मार्गावर गांजाची अवैध वाहतूक होत असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी मालखेड येथील उद्यानाजवळ नाकाबंदी करून एका ट्रकमधून ४३५ किलो वजनाचा गांजा जप्‍त केला. आंध्रप्रदेशातून पांढरकवडा-यवतमाळ-बाभुळगावमार्गे अमरावतीत ट्रकमधून गांजाची तस्‍करी होत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्‍हे यांच्‍यासह पोलिसांच्‍या पथकाने चांदूर रेल्‍वे ते अमरावती मार्गावर मालखेड उद्यानाजवळ शनिवारी सकाळी नाकाबंदी केली.पोलिसांनी एका आयशर ट्रकला अडवून तपासणी केली, तेव्‍हा त्‍यांना प्‍लास्टिकच्‍या रिकाम्‍या ‘कॅरेट’ खाली गांजा दडवून ठेवलेला आढळला. या गांजाचे वजन ४३५ किलो असून पोलिसांनी ट्रक आणि दोन दुचाकींसह ७४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. या ट्रकच्‍या पुढे आणि मागे दोन दुचाकी होत्‍या. दुचाकीवरील लोक ट्रकचालकाला रस्‍त्‍यावरील हालचालींची बातमी पुरवत होते, पण मालखेड उद्यानाजवळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाही.पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून ऋषभ पोहोकार (२५, रा.रिद्धपूर, मोर्शी), विक्‍की युवनाते (२०, रा. शिरजगाव कसबा, चांदूर बाजार), शेख अरबाज शेख इलियास (१९, आझाद नगर, अमरावती) आणि शेख तौसिफ शेख लतिफ (१९, रतनगंज, अमरावती), अशी आरोपींची नावे आहेत.ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्‍या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्‍हे यांच्‍या नेतृत्‍वात पोलीस निरीक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाने, रवींद्र बावने, बळवंत दाभणे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, मूलचंद भांबूरकर, मोहन मोरे, अमोल देशमुख, विलास रोकडे, नीलेश डांगोरे, नितीन कळमकर, प्रमोद शिरसाट यांनी ही कारवाई केली.