वाकान येथे स्मशानभुमी व दहनशेड नसल्याने मोठी अडचण
यवतमाळ / हरीश कामारकर
महागाव तालुक्यातील वाकान गावात मृत्यु झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा व दहनशेड नसल्याने नातेवाईकांना पडत्या पाण्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत असुन याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
महागाव तालुक्यातील वाकान गावचा पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी गेल्या अनेक प्रलंबित असुन गावाला अनेक समस्यांनी घेरले आहे.गावात जर कोणाचा मृत्यु झाल्यास स्मशानभुमी व दहनशेड नसल्याने गावालगत असलेल्या नदीच्या पलिकडील काठावर डोंगराच्या पायथ्याशी उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्या जातात.परंतु पावसाळ्याच्या दिवसात मात्र नदीला पुराचे पाणी असते त्यात जर कोणाचा मृत्यु झाला तर मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांसमोर अंत्यसंस्कार कोठे करायचे? हा प्रश्न कायम उभा आहे असाच काहीसा प्रकार आज (दि.५सप्टेंबर २०२२) रोजी घडला येथील कुंडलिक शिवराम खटारे(वय७५ वर्षे) यांचा दिनांक ४ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने मृत्यु झाला त्यात सकाळ पासुनच पाऊस सुरू नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी पाऊस कमी होण्याची प्रतिक्षा केली परंतु पाऊस कमी होत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी गावालगत असलेल्या कोनदरी शिवे मध्ये धोधो बरसणाऱ्या पावसात ताडपत्री झाकुन चिता रचली व मृतदेहाला भडाग्नी दिला. गावालगत असलेल्या नदीला काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येवुन शासनदरबारी पुनर्वसनाची फाईल धूळखात पडली असुन जिवंतपणी मरणयातना भोगत असतांना मेल्यावरही या अडचणी गावकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. वाकान वासीयांच्या ज्वलंत समस्येकडे लक्ष द्यायला मात्र कोणताही लोकप्रतिनिधी तयार नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
###चौकट###
वाकान हे यवतमाळ वाशीम लोकसभा व पुसद विधानसभा क्षेत्राचे शेवटचे गाव असुन २००६च्या महापुरानंतर गावचे पुनर्वसनाच्या आश्वासनाचे गाजर गावकऱ्यांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून देण्यात आले .तेव्हा पासुन आजपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही. गावकऱ्यांनी खासदार भावना ताई गवळी ,आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे गावचे पुनर्वसन , स्मशानभुमी व दहनशेड देण्याची मागणी केली असता त्यांना गावकऱ्यांच्या मागण्याशी काहीही देणेघेणे नसुन दोन्ही लोकप्रतिनिधी फक्त मतदान मागण्यासाठीच गावात येवुन आश्वासनाची खैरात करून गावकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार नेहमीच करीत आहेत.
:- विनोद राठोड (गावकरी वाकान)
###चौकट###
वाकानमध्ये आज पावेतो स्मशानभुमी ची जागा ग्राम पंचायतच्या मालकीची नसल्याने स्मशानभुमीसाठी ई-क्लास जमीन देण्याचा मागणीप्रस्ताव शासनाकडे दाखल केला आहे असुन जनसुविधा योजनेमधुन दहनशेड मिळण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
:- अश्वजित भगत (सरपंच वाकान)