सतिष घाटगे यांना अर्जुन खोतकर यांच्याकडून शिंदे गटात प्रवेशाचं जाहीर आमंत्रण
घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना – माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरु झालेल्या दिसत आहेत.समृद्धी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन सतिष घाटगे यांना खुल्या व्यासपीठावर अर्जुन खोतकर यांच्याकडून शिंदे गटात प्रवेशाचं जाहीर आमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं एकहाती वर्चस्व असलेला जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटानं कंबर कसलेली या ऑफर वरून दिसत आहे.
घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथे गुरुवार रोजी समृद्धी गणेश फेस्टिव्हल हा कार्यक्रम पार पडला.समृद्धी फेस्टिवलच्या बहारदार नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री माधुरी पवार यांच्या लावण्याच्या कार्यक्रम हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित संपन्न झाला.
या कार्यक्रमात शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी समृद्धी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन सतिष घाटगे यांना शिंदे गटात येण्याचं जाहीर आमंत्रण दिलं.त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्योजक सतिष घाटगे हे राजेश टोपे यांच्यासमोर आव्हान उभं करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले,कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांनी उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती केलेली असून,त्याचबरोबर त्यांनी राजकारणात उतरून आणखीन प्रगती करावी. यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव घेतला आहे.सतिष घाटगे यांना राजकीय आमंत्रण देण्यासाठीच मी याठिकाणी आलो असल्याचेच त्यांनी उपस्थितांना सांगितले.यासाठी गणपती बाप्पा त्यांना सुदबुद्धी देऊन, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विघ्न दूर करो, असेही ते म्हणाले.
या प्रस्तावावर त्यांनी विचार करावा असेही खोतकर यांनी शेवटी सांगितले.यावेळी सर्वपक्षीय मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान,खोतकर यांच्या विधानाने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, अनेकांकडून याबाबत तर्क- वितर्क लावले जात आहेत.सोशल मीडियावर आपापल्या नेत्याच्या समर्थनार्थ सोशल वार सुरू झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे विरूद्ध दुरंगी की तिरंगी लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ऑफर चा भविष्यात नक्कीच विचार करू; सतिष घाटगे
समृद्धी गणेश फेस्टिव्हलमध्ये मागील दहा दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. यासाठी जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले.उद्योग क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येत असतात.मात्र खोतकर यांनी केलेल्या राजकीय विधानावर भविष्यात नक्कीच विचार करू,असे सतिष घाटगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.