अमीन शाह ,
अमरावती शहरातून बेपत्ता झालेल्या मुलीच्या प्रकरणाला लव्ह जिहादचे वळण देणे खासदार नवनीत राणा यांना चांगलेच महागात पडले आहे . ज्या तरुणाविरुद्ध राणांनी हा आरोप केला , त्याच्या वडिलांनी तक्रार करत समाजात राणांनी बदनामी केल्याचे म्हटले आहे . त्यामुळे राजापेठ पोलिसांनी राणांविरुद्ध कलम ५०४ , ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . अमरावतीतून तरुणी गायब झाल्यानंतर तिच्या वडिलांनी नवनीत राणांची भेट घेतली होती . त्यानंतर या प्रकरणाला लव्ह जिहादचे वळण लागले . राणा यांनी पोलीस ठाण्यात आताच्या आता मुलीला आमच्यासमोर हजर करा , असे म्हणत राडा केला होता . गायब झालेली युवती सातारा पोलिसांना मिळून आली होती . तिला अमरावती पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात आला . तिने मी शिक्षणासाठी बाहेर गेली होती . खासदार राणा यांनी माझी बदनामी करू नये , असे जवाबात म्हंटले होते . त्यामुळे राणा तोंडघशी पडल्या होत्या ,
त्यानंतर आता मुस्लीम मुलाचे वडील कादर शहा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे , की माझा मुलगा सोहेल याच्यावर लव्ह जिहादचे खोटे आरोप नवनीत राणा यांनी लावले . त्यामुळे आमची समाजात बदनामी झाली . आमच्या कुटुंबातील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यासोबत चुकीची वर्तणूक करण्यात आली , असे तक्रारीत म्हटले आहे . दरम्यान , गुन्हा दाखल झाल्याचे कळताच राणा यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला . माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून सिंह यांनी दबाव टाकला . त्या माझा किती द्वेष करतात , हे खोटा गुन्हा दाखल केल्याने सिद्ध झालं आहे , असे राणा म्हणाल्या .