आदिवासी विभागाने घेतली दखल; आयुक्तांना दिले निर्देश.
( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी : शासकीय आदिवासी वस्तीगृहामधील रमेश रामदास मेश्राम या विद्यार्थ्यांच्या म्रुत्युची दखल आदिवासी विकास विभागाने घेतली असून चौकशी करुन दोषी असल्यास संबंधितावर कारवाई करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश नाशिक येथील आयुक्तांना आदिवासी विकास विभागाने दिले आहे.
यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचेकडे ट्रायबल फोरमचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी तक्रार करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
रमेश मेश्राम हा विद्यार्थी केळापूर तालुक्यातील दागाडी पोड येथील रहिवासी आहे. तो बी. ए. ला बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे शिक्षण घेत होता.
दिनांक ८ जून २०२२ रोजी त्याला ताप आला होता. लगेच त्याने उप जिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे तपासणी केली असता त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी भरती होण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्याच्यासोबत शासकीय वस्तीगृहातील अधीक्षक किंवा संबंधित कर्मचारी कोणीही गेले नसल्यामुळे त्याला भरती करून घेण्यात आले नाही. शेवटी त्याच्यासोबत असणाऱ्या वस्तीगृहामधील काही विद्यार्थ्यांनी त्याला त्याच्या गावी पोहचवून दिले. त्यानंतर त्याचा १० जून रोजी मृत्यू झाला.
सदर म्रुत्युच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मृतकाच्या बहिणीने विनंती केल्या नंतरही प्रकरण अंगलट येऊ नये किंवा सामाजिक संघटनेला याबाबतची माहिती होऊ नये म्हणून मृतकाच्या बहिणीला आश्वासने देऊन त्याला आर्थिक मदत देऊ, असे प्रकल्प अधिकारी, कर्मचारी यांनी सांगितले होते व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे ट्रायबल फोरम संघटनेने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मृतकाला योग्य न्याय देण्याची मागणी करत या प्रकरणात जबाबदार असलेले संबंधित गृहपाल, अधीक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली होती