( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी – राज्यातील सर्वात महत्वाचा व वादग्रस्त असलेला व मंजुरीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ताडसावळी येथील निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत बुडीत क्षेत्रातील लोकांची मते नव्याने जाणून घेण्याकरिता निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ व मराठवाड्याच्या वतीने 10 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता सावळी (सदोबा) येथील साई मंगल कार्यालयात जाहीर सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप व प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
मागील काही दिवसांपासून ताडसावळी येथील निम्न पैनगंगा प्रकल्प बांधकामासाठी सर्व अडथळे दूर झाले, बुडीत क्षेत्रातील शेतीच्या खरेदीची विक्रीचे व्यवहार बंद झाल्याचे शासनाचे पत्र निघाले आहे. आता निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशा विविध प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रातून सतत झळकत असल्याने बुडीत क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर वर्गात भीतीचे व संशयाचे वातावरण या प्रकल्पाबाबत तयार झाले आहे. या सर्व प्रकारच्या चर्चेबद्दल व भविष्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत निश्चित कोणती भूमिका घ्यावी.? काय करावे.? यासाठी बुडीत क्षेत्रातील सर्व नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील या प्रकल्पाबद्दलचा लढा कसा लढायचा याबद्दलची रणनीती ठरविण्यासाठी ही जाहीर सहविचार सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती, धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप व प्रसिद्ध प्रमुख मुबारक तंवर यांनी दिली असून विदर्भ व मराठवाड्यातील बुडीत क्षेत्रातील नागरिकांनी या सहविचार सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून निम्न पैनगंगा प्रकल्याबाबत आप – आपली मते मांडण्याचे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीच्या आयोजकांनी केली आहे.