घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
मुलीने वडिलाच्या आजारपणासाठी घरात ठेवलेल्या १ लाख ७० हजाराच्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिण्यावर घरात कोणी नसल्याची संधी साधत दरोडेखोरांनी डल्ला मारत दोन लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.
ही घटना १३ डिसेंबर मंगळवारी पहाटे ४ च्या दरम्यान घडली असून पुतण्या महेश गिरी हे सकाळी ६ वाजता उठले असता काकू गावावरून परत आल्या की काय हे बघण्यासाठी गेले असता चोरीची घटना समोर आली .याविषयी अधिक माहिती अशी की,वडीगोद्री येथील अंगणवाडी सेविका शिवकन्या शहादेव गिरी या आपल्या विवाहित मुलगी आजारी असल्याने तिला मुंबईला भेटण्यासाठी गेल्याची संधी साधत बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी कपाटातील असलेली १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम एक सोन्याचा ओम व कानातले असा २ लाख रुपयाचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला.
एवढ्यावर न थांबता चोरट्यानी त्याच गल्लीतील बंद असलेल्या कचरु शिकारे यांच्या ही घराचे कुलूप तोडले व आजूबाजूच्या घराच्या कड्या लावून घेतल्या होत्या,असे नागरीकांनी सांगितले.
या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलीस श्वान पथक व ठसे तज्ञ यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली.मात्र अद्यापही दरोड्याबाबत गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही.या दरोड्यामुळे वडीगोद्री परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
चौकट नं..१
दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद.
राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोड वरून दरोडेखोर गावात जातांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सहा तरुण हातात काठ्या,तलवारी घेवून जाताना कैद झाले आहेत.यातील दोघांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता.खुलेआम हातात शस्त्रे घेवून दरोडेखोर गावात फिरत असल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट नं…२
परिसरातील चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना, उलगडा मात्र एकाचा ही होईना.
गेल्या महिन्यात दोदडगाव येथे गट नंबर १४२ मध्ये चंद्रकांत पांढरे यांच्या घराचे भरदिवसा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी कपाटातील चारतोळे सोन्यासह २५ हजार रूपये रोख असा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.तर धाकलगाव येथे मुलीच्या लग्नासाठी घरात पैसाची जमाजमवी केली असताना चोरट्यांनी घराच्या कडया लावून २ तोळे सोने व नगदी ऐवज ८५ हजार रुपये लंपास केले होते.या दोन्ही घटना चोऱ्यांचा तपास लागला नाही तोच आजच्या घटनेने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.